

मोशी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मोशी येथील एका सोसायटीत गणपती विसर्जन मिरवणूक निघाल्यानंतर त्यात सहभागी झालेल्या लहानग्याचा सोसायटीत अग्नीशामक पाईपलाईन नजीक पाण्याच्या टाकीच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.28) रोजी मोशी येथील बोर्हाडेवस्ती येथील एका सोसायटीजवळ रात्री आठ ते नऊच्या दरम्यान घडली. अर्णव आशिष पाटील (वय 5, रा. मंत्रा मुमेंट सोसायटी, मोशी) असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे.
अर्णव हा त्याच्या आई -बाबांसोबत सोसायटीच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक पहायला गेला होता. या वेळी बरेचजण पाण्याच्या टाकीच्या झाकणावर उभे राहून मिरवणूक पहात होते. या वेळी अर्णवदेखील तिथेच उभा होता. मिरवणूक पहाण्यात मग्न असलेल्या त्याच्या आई-बाबांना अर्णव दिसला नाही. तासभर शोधला तरी तो सापडला नाही. या वेळी त्यांनी शोधा-शोध सुरू केली.
शेवटी त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तो टाकीच्या झाकणावर उभा असलेला दिसला. या वेळी सर्वजण टाकीजवळ गेले असता टाकीचे झाकण नजीक मोकळा भाग खुला होता, त्यातून पडूनच दुर्घटना घडली असल्याची शंका उपस्थित होत आहे. निष्काळजपणामुळे अर्णव याचा बुडून मृत्यू झाला. विसर्जनापूर्वी प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन केले असतानाही आशा दुर्घटनेत चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा