

पुढारी ऑनलाईन डेस्क : काही दिवसांपूर्वी हरियाणाच्या यमुना नगरमध्ये राहणाऱ्या डेंटिस्ट नितेश चोप्रा यांना छातीमध्ये दुखण्याचा त्रास झाला होता. यामुळे त्यांनी त्यांच्याजवळील अॅपल वॅाच द्वारे ECG काढला. यामध्ये त्यांना त्यांच्या तब्येतीबाबत अनियमिततेची मिळाली. दरम्यान, या वॅाचने दिलेला सावधानतेचा इशारा गंभीरतेने घेत ते लगेचच पत्नीला सोबत घेऊन जवळच्या हॅास्पिटलमध्ये गेले आणि डॅाक्टरांना हा वॅाचचा ECG रिपोर्ट दाखवला. यावेळी डॅाक्टरांनी खात्री करून घेण्याकरिता त्यांच्याजवळील तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पुन्हा एकदा नवीन ECG काढला. विशेष म्हणजे यामध्ये देखील तोच रिपोर्ट आला जो अॅपल वॅाचने दाखवला.
त्यानंतर अँजिओग्राफी करवून घेण्याचा सल्ला देत डॅाक्टरांनी नितेश यांना त्वरीत अॅडमिट करवून घेतले. दरम्यान त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. या अँजिओग्राफीच्या रिपोर्टमध्ये समजले की, त्यांची मुख्य कोरोनरी आर्टरी पूर्णपणे ब्लॅाक झालेली आहे. यावर डॅाक्टरांनी उपचाराची माहिती देत, तुम्ही योग्यवेळी हॅास्पिटलमध्ये आलात, असे नितेश यांना सांगितले.
यानंतर नितेश यांच्या पत्नी नेहर यांनी अॅपल कंपनीचे आभार मानत एक पत्र लिहिले. या पत्रात त्या म्हणाल्या की, आम्ही तुम्ही दिलेल्या या नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन लवकरात लवकर हॅास्पिटलमध्ये पोहोचू शकलो. वॅाचने दिलेल्या सुचनेमुळे माझ्या पतीच्या आजारावर उपचार घेतल्याने प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ शकली.
यामध्ये नितेश यांनीदेखील या वॅाचबद्दल सांगितले की, 30 वर्षाच्या व्यक्तीला हा आजार कसा काय होऊ शकतो याचा विचार करून जर मी दुर्लक्ष केले असते तर, मला भविष्यात अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागले असते. असे म्हणत त्यांनी देखील या पत्रातून कंपनीचे आभार मानले.
कंपनीने या पत्राला अभिप्राय देत म्हटले की, आम्हाला खूप आनंद आहे की, तुम्ही वॅाचने दिलेल्या सुचनेचा आधार घेऊन लवकरात लवकर हॅास्पिटलमध्ये पोहचलात आणि आवश्यक ते उपचार करवून घेतला. पुढे कंपनीने या तंत्रज्ञानासंबधी दिलेल्या सकारात्मक प्रतिक्रियेबद्दल आभार देखील यावेळी मानले.
कसे आहे ECG अॅप
हे ECG अॅप Apple Watch Series 4, Series 5, Series 6 किंवा Series 7 वर इलेक्ट्रिकल हार्ट सेन्सर वापरून तुमच्या हृदयाची तपासणी करते. त्यानंतर अॅट्रियल फायब्रिलेशन (एएफआयबी) साठी रेकॉर्डिंग तपासले जोते.
तुम्ही कधीही ईसीजी घेऊ शकता, जेव्हा तुम्हाला हृदयाचे ठोके जलद होणे किंवा थांबणे यासारखी लक्षणे जाणवत असतील तेव्हा तुम्ही तुमचा ईसीजी तपासला पाहिजे.
हेही वाचा