‘एनी डेस्क’ने कनेक्ट होताय…सावधान! कारण चालू वर्षात झाली 162 जणांची फसवणूक

‘एनी डेस्क’ने कनेक्ट होताय…सावधान! कारण चालू वर्षात झाली 162 जणांची फसवणूक
Published on
Updated on

पिंपरी : सरकारी कार्यालय, बँक किंवा कॉल सेंटरमधून बोलत असल्याचे सांगून जर कोणी मोबाईलमध्ये 'एनी डेस्क'सारखे थर्ड पार्टी अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगत असेल तर जरा सावध व्हा……! कारण चालू वर्षात पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील एकूण 162 जणांची 'एनी डेस्क'मुळे आर्थिक फसवणूक झाल्याची पोलिसदफ्तरी नोंद आहे. त्यामुळे मोबाईलमध्ये 'एनी डेस्क' डाऊनलोड करताना खबरदारी घेण्याचे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे.

जगभरातील लाखो आयटी व्यावसायिकांकडून 'एनी डेस्क' या थर्ड पार्टी अ‍ॅपचा वापर केला जातो. मोबाईल, संगणक या उपकरणांशी दूरस्थपणे कनेक्ट होऊन तांत्रिक समस्या सोडविण्यासाठी हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. या अपच्या मदतीने झटपट तांत्रिक मदत मिळवता येत असल्याने अलीकडे याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, अलीकडे सायबर चोरटयांनी अ‍ॅपच्या मदतीने नागरिकांना गंडा घालण्याचा सपाटाच लावला आहे.

चोरटे नागरिकांच्या मोबाईलचा कनेक्ट मिळवण्यासाठी 'एनी डेस्क' सारख्या "रिमोट एअ‍ॅक्सेस सॉफ्टवेअरचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारचे कोणतेही अ‍ॅप मोबाईलमध्ये डाउनलोड करून नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

टोल फ्री क्रमांकावरील तक्रार पडतीये महागात

ग्राहक तक्रार सांगण्यासाठी कंपन्यांच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करतात. त्यानंतर कंपन्यांच्या ग्राहकांचा डेटा चोरून सायबर चोरटे संबंधित तक्रारदाराला फोन करतात. समस्या सोडवण्याच्या बहाण्याने ग्राहकाला 'एनी डेस्क' सारखे थर्ड पार्टी अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले जाते. अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर चोरटे 'अ‍ॅक्सेस की' जाणून घेतात. ग्राहकाने अ‍ॅक्सेस की दिल्यानंतर काही वेळातच मोबाईलमध्ये असलेल्या बँकेच्या गोपनीय माहितीचा आधारे ग्राहकाचे पैसे हस्तांतरित करून फसवणूक केली जाते.

तपासात अडचणी

अशा प्रकारच्या फसवणुकींना आला घालण्यासाठी ओटीपी किंवा गोपनीय माहिती कोणासही सांगू नये. याबाबत पोलिस नेहमीच जनजागृती करीत असतात. माध्यमांमध्ये देखील दररोज अशा प्रकारच्या घटना वाचायला किंवा पाहायला मिळतात; मात्र, तरी देखील नागरिक जाबदारीने वागत नसल्याचे फसवणुकीच्या वाढत्या आकडेवारीवरून समोर येत आहे. फसवणूक झाल्यानंतर नागरिक पोलिसांच्या मागे तगादा लावतात. पोलिस संबंधित मोबाईल व खाते क्रमांकांची माहिती काढतात. मात्र, अशा प्रकारे फसवणूक करणारे साता समुद्रापार बसून हे रॅकेट चालवत असल्याने तपासात मोठ्या अडचणी येतात.

घटना

महावितरण कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून सायबर चोरट्याने प्रजेश सुरेश सपकाळ (45, रा. साई अवेन्यू सोसायटी, पिंपळे सौदागर) यांना मोबाईलमध्ये AnyDesk Remote Desktop Software डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार, सपकाळ यांनी अ‍ॅप डाऊनलोड केले. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातील चार लाख 3 हजार 992 रुपये चोरट्यांनी परस्पर हस्तांतरित करून घेतले. हा प्रकार 23 मे 2022 रोजी उघडकीस आला.

कोणतीही बँक, कस्टमर केअर अथवा शासकीय अधिकारी मोबाईलमध्ये अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगत नाही. त्यामुळे जर कोणी मोबाईलमध्ये अ‍ॅप घेण्यास दबाव टाकत असेल, तर नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे. अलीकडे 'एनी डेस्क' अ‍ॅप डाऊनलोड केल्याने होणार्‍या फसवणुकींचे प्रमाण वाढले आहे.

-डॉ. संजय तुंगार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर सेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news