

परभणी, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने चिठ्ठी लिहून सनपुरी येथील एका तरुणाने आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना शनिवारी (दि.13) पहाटे उघडकीस आली. सचिन रामराव शिंदे (वय 34) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जिल्हयासह राज्यात ठिकठिकाणी झालेल्या मोर्चे व बैठकांना सनपुरी (ता.परभणी) येथील सचिन शिंदे हजर राहत होता. काही दिवसांपासून समाजाला आरक्षण मिळत नसल्याने सचिन हा चिंताग्रस्त झालेला होता. शनिवारी पहाटेच्या सुमारास या तरुणाने सनपुरी शिवारातील एका झाडाला गळफास घेवून जीवन संपवल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या आशयाचा मजकुर लिहिलेली चिठ्ठी आढळल्याची माहिती मिळाली .
या घटनेची माहिती ग्रामीण पोलिस ठाण्यातील अधिकार्यांना मिळाल्यानंतर कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. होता. सचिन मराठाआरक्षणासाठी आग्रही होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. सचिन शिंदे याच्या पश्चात आई. वडील, पत्नी, भाऊ, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.