

काय हो आबुराव, आपले सध्याचे मुख्यमंत्री फारच खेळकर आहेत का हो?
कशावरून वाटलं तुम्हाला असं? त्यांनी भर सभेत कबुलीजबाब दिला की हो, त्यांच्या साडेतीन महिन्यांपूर्वीच्या महानाट्याचा.
सभेत म्हणजे विधानसभेत का? नाही हो. दामलेंच्या आपल्या प्रशांत विश्वविक्रमी नाट्यप्रयोगाच्या सभेत.
तिथे म्हणता होय? एका लग्नाची पुढची गोष्ट का दुसरी गोष्ट ना? असेल बुवा. काय आहे, नाटकाच्या संदर्भातलं भाषण होतं, म्हणून तिथे महानाट्य असं म्हणाले. तमाशानंतरची सभा असती तर तिथे महातमाशा असं म्हणाले असते. हाडाचे महाचतुर आहेत ना ते?
कोणतीही सभा कशी हसत खेळत राहिली पाहिजे ह्यावर ठाम असतात काही माणसं. मस्त टाळ्याबिळ्या मिळतात. पब्लिक खूश राहते.
प्रश्नच नाही. असे प्रयोग राजकारणातल्या लोकांना बारमाही करावे लागतातच नाहीतरी.
सगळ्या खराब नाट्यगृहांची रीतसर पाहणी करू, 'चित्रनगरी उमारूर वगैरे आश्वासनंही खूपच दिलीयेत वाटतं तिथे.
तेही बरोबरच ठिकाणी नाटक, सिनेमाचा संदर्भ होता. जर जादूच्या प्रयोगांनंतर ही सभा भरली राजकीय असती तर 'जादूसाहित्याची नगरी' उभारू, असं म्हणाले असते. असंच करावं लागतं त्यांना. गर्दी पाहिजे. खूश झाली पाहिजे.
तरीही अशी फटाफटा आश्वासनं दिली की, ती पूर्ण करायची जबाबदारीपण येणार ना?
कोण म्हणतं?
आता वेगळं म्हणायला कशाला पाहिजे? जाहीर सभेत एवढ्या लोकांच्या साक्षीने आश्वासनं दिली म्हटल्यावर पुढचं उत्तरदायित्व आलंच.
असं आपल्याला वाटतं. खरोखर राजकारणात मुरलेल्यांना त्याचं काही टेन्शन येत नसतं. हीच तर आपल्या राजकारणाची पुढची गोष्ट आहे. शब्द द्या, सभा जिंका, विसरून जा, लोकांच्या विसराळूपणावर विश्वास ठेवा. 'अरे, हाय काय? अन् नाय काय?' प्रशांत दामलेंची फेमस टॅग सगळ्या खराब नाट्यगृहांची लाईन हीच आहे ना?
– झटका