

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शनिवार पेठ येथील वैष्णवी पोवार खूनप्रकरणी पाचवा संशयित निष्पन्न झाला आहे. मठातील सेवक प्रशांत ऊर्फ नर्या संदीप शेवरे (वय 26, रा. देवठाणे, ता. पन्हाळा) असे त्याचे नाव आहे. लक्ष्मीपुरी पोलिसांनी त्यास मंगळवारी अटक केली. मित्रासोबत 'लिव्ह इन'मध्ये राहण्याचा आग्रह धरणार्या युवतीला परावृत्त करण्यासाठी तिला मारहाण करण्याचा देवठाणे येथील मठातील महाराजाने तिच्या आईला सल्ला दिला होता, अशीही माहिती चौकशीत निष्पन्न झाली आहे.
वैष्णवी पोवार हिने पुण्यातील मित्रासोबत लग्नाऐवजी लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. तिची भूमिका आई, भावासह अन्य संशयितांना मान्य नव्हती. देवठाणे येथील महाराजानेही तिच्या परिवर्तनासाठी प्रयत्न केले होते. पण तिने दाद दिली नाही.
शिवाय आई, भावाकडूनही वैष्णवीची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र वैष्णवी भुमिकेवर ठाम राहिल्याने तिच्यावर सर्वांचा डूख होता. तिला बेदम मारहाण करा, म्हणजे ती परावृत्त होईल, असा सल्ला महाराजाने पोवार कुटुंबीयांना दिला होता. मारहाण करण्यासाठी तिला देवठाणे येथील मठात घेऊन जाण्यासही त्याने बजावले होते, अशीही माहिती चौकशीतून पुढे आली आहे.