साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे
Published on
Updated on

अण्णा भाऊ साठे यांनी अल्पशिक्षित असूनही अखंडपणे अक्षरवाङ्मयाची निर्मिती केली. लौकिक अर्थाने चार भिंतीच्या बंदिस्त शाळेत न शिकता आयुष्यभर जगाच्या उघड्या शाळेत अनुभवांचे पाठ गिरवत अण्णा भाऊ हे गौतम बुद्धांच्या 'अत्त्त दिप:भव :।' या वचनाप्रमाणे स्वत:च्याच जीवनाचे स्वत: शिल्पकार बनले. बहुजन समाजाला सत्त्व, स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचे बाळकडू पाजवून ते स्वयंप्रकाशित करीत राहिले. आज, मंगळवारी त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने…

रूढार्थाने कोणत्याही विद्यापीठाची पायरी न चढलेल्या अण्णा भाऊंच्या साहित्याचा म्हणूनच महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांतून अभ्यासक्रमासाठी समावेश करण्यात आला. एवढेच नव्हे तर या निरक्षर माणसाच्या साहित्यावर आज शेकडो लोकांनी पीएच.डी केली आहे आणि करीत आहेत. साहित्य आणि समाज यांचा परस्परांशी अन्योन्य संबध असतो. साहित्य हे समाजपरिवर्तनाचे एक प्रभावी हत्यार असते. यावर अण्णा भाऊंचा ठाम विश्वास होता आणि त्यांनी 32 कादंबर्‍या, 14 कथासंग्रह, 11 पोवाडे, 14 लोकनाट्ये, इनामदार नावाचे एक नाटक आणि शेकडो लावण्या, गीते (क्रांतिगीते, वीरगीते, महाराष्ट्रगीते, कामगारगीते) लिहिली. त्यांच्या एकूण 7 कादंबर्‍यांवर 1961 पासून 1970 पर्यंत मराठी चित्रपट तयार करण्यात आले. 'फकिरा', 'वारणेचा वाघ', 'अशी ही सातार्‍याची तर्‍हा', 'डोंगरची मैना', 'टिळा लावते मी रक्ताचा' हे त्यातील काही चित्रपट त्याकाळी खूपच लोकप्रिय झाले होते. यातील 'वैजयंता', 'अशी ही सातार्‍याची तर्‍हा' आणि 'वारणेचा वाघ' या चित्रपटांना महाराष्ट्र शासनाचे विशेष पुरस्कारही मिळाले होते. फकिरा या चित्रपटात अण्णा भाऊंनी स्वतः सावळ्या मांग ही केलेली भूमिका अण्णाभाऊंच्यातील हरहुन्नरी अभिनयकला खूप काही सांगून जाते.

मराठी साहित्याच्या दरबारात फकिराच्या तलवारीइतकीच तेजाने तळपणारी, धारदार अशी अण्णा भाऊंची लेखणी, त्यांच्या लेखणीला कल्पनेची नव्हे तर वास्तवाची जोड होती. जे पाहिले, अनुभवले तेच लिहिले हे त्यांचे तत्त्व होते. मला हे लिहिलेच पाहिजे, या न्यायाने त्यांनी लिहिले. अण्णा भाऊंनी दलित साहित्य हा शब्दप्रयोगही जन्माला येण्याच्या अगोदरपासूनच पालावरचे जग, गावकुसाबाहेरची संस्कृती, दलित, भटके – विमुक्त स्त्री-पुरुष यांना आपल्या साहित्याचा केंद्रबिंदू मानून साहित्यनिर्मिती करीत होते. न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड असणारे नायक-नायिका अण्णा भाऊंनी मराठी साहित्यात बंडखोरपणे पहिल्यांदा मांडले. अण्णा भाऊंचे हे नायक-नायिका कच खाणारे, हार पत्करणारे नव्हते तर शत्रूचा वार परतवून लावणारे, वेळप्रसंगी डमडमची गोळी छातीवर बेडरपणे झेलणारे होते. हौतात्म्य पत्करून अजरामर होणारे होते. स्त्रीचे शील, पुरुषांचा स्वाभिमान आणि देशाचे स्वातंत्र्य हा अण्णा भाऊंच्या साहित्याचा मूळ स्वरूपातील गाभा होता. 'चीड बेकीची आणि गरज एकीची' हा अण्णा भाऊंच्या साहित्याचा संदेश होता.

कणसं खुडून पोट भरता येते, पण कोणाची अब्रू लुटून पोट भरत नसतं हे अण्णा भाऊंच्या साहित्याचे नीतिमान असे तत्त्व होते. आपण कोणावर अन्याय करायचा नाही आणि विनाकारण इतरांकडून होत असलेला अन्याय – अत्याचार गुमानपणे सहन करावयाचा नाही हा अण्णा भाऊंच्या साहित्याचा आदर्शवाद होता. अण्णा भाऊंच्या नायिकांच्या कधी पदर ढळला नाही, अण्णा भाऊंचा नायक कधी बदफैली, व्यसनांधही बनला नाही. अण्णा भाऊंचा नायक कथेच्या सुरुवातीला जर दारूडा असेल तर कथेच्या शेवटी तो व्यसनमुक्त झालेला आढळतो. अण्णा भाऊंच्या नायिका 'मला भाकरीपेक्षा इज्जत प्यारी आहे, चारित्र्य हाच माझा अलंकार आहे', असे म्हणणार्‍या होत्या. स्वतःच्या शिलाच्या संरक्षणासाठी त्या रडत बसणार्‍या नायिका नसून शत्रूविरुद्ध सर्वशक्तीनिशी लढत राहणार्‍या नायिका होत्या. झोपडीत राहून आणि फाटक्या वस्त्रात असूनही त्या शीलवान होत्या. म्हणूनच बुद्धाच्या प्रज्ञा, शील आणि करुणा या तत्त्वत्रयीचा सुंदर संगम अण्णा भाऊंच्या साहित्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आढळतो. चटणी-भाकर खाऊन, गावकुसाबाहेर राहूनही अण्णा भाऊंच्या नायकांमध्ये वाघाच्या जबड्यात हात घालून, वाघाचे दात मोजण्याची हिंमत नायकांमध्ये होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news