

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा वाहनांचा ताफा बाजीराव रस्त्यावरील गर्दीतून सायरन वाजवीत निघालेला… अप्पा बळवंत चौकात दुचाकीवर काही पत्रकार थांबलेले… मुख्यमंत्री मार्गस्थ झाल्यानंतर पत्रकार मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्याच्या ठिकाणी पोहचलेले… मात्र, अर्धा-पाऊण तास झाला तरी मुख्यमंत्री येईनात… पत्रकारांनी शोध घेतल्यावर समजले की शिंदे एका दुकानात थांबलेले… मुख्यमंत्री शिंदे यांनी भाजपबरोबरच कसबा पेठ मतदारसंघाची पोटनिवडणूक खूप मनावर घेतली आहे.
फडके हौद चौकाजवळ आरसीएम गुजराती हायस्कूलमध्ये शिंदे यांनी विविध समाजघटकांशी संवाद साधण्यासाठी मेळावा आयोजिला होता. त्या मार्गावर सोन्या मारुती मंदिराकडून फडके हौदाकडे जाताना ते एका दुकानापाशी थांबले. भाजपचे स्थानिक कार्यकर्ते अरविंद ऊर्फ पप्पू कोठारी यांचे ते मोबाईल फोनचे दुकान. शिंदे यांच्या गाड्यांचा ताफा या लहानशा दुकानापाशी थांबला. शिंदे थेट कोठारी यांच्या भेटीला पोहचले. शिंदे यांनी काही वेळ त्यांच्याशी चर्चा केली. त्या वेळी दुकानाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी होऊ लागली. पप्पू कोठारी, संदीप कोठारी, राजेश परमार, विशाल पुनिया, कोनिका कोठारी, हितेश परमार आदींनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. त्यामुळे पाच मिनिटे थांबून मुख्यमंत्री पुढे मेळाव्याच्या दिशेने मार्गस्थ झाले.
मुख्यमंत्री स्वतः अशा पद्धतीने कार्यकर्त्यांची भेट घेत असल्याने त्यांनी निवडणूक किती गांभीर्याने घेतली, ते लक्षात येते. कोठारी हे खासदार गिरीश बापट यांचे समर्थक असून, महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत ते भाजपकडून लढले होते. भाजपचे नेते प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही त्यांची आज दुपारी दुकानात जाऊन भेट घेतली. यापूर्वी गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील या मंत्र्यांनीही कोठारींसह अन्य प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत प्रचाराला गती दिली आहे.