

ज्ञानेश्वर बिजले
यूपीए आता कोठे राहिले आहे, असा प्रतिप्रश्न पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उपस्थित करताच देशाच्या संथ राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली. दिल्लीतील प्रमुख पदाची महत्त्वाकांक्षा बाळगून आक्रमक झालेल्या ममता दिदीच्या या वक्तव्याने अनेक राजकीय घडामोडीला वेग दिला आहे. अडीच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत लोकसभेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास, ममता दिदीला पंतप्रधान होण्याची संधी मिळू शकते.
मात्र, ते वाटते तेवढे सोपेही नाही. त्यासाठी परिस्थितीही तशी अनुकूल व्हायला हवी. तृणमूलला दिल्लीतील सत्ता अन्य पक्षांच्या मदतीने मिळवायची असल्यास, भाजपचे दोनशेपेक्षा कमी खासदार, तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे शंभरच्या आसपास खासदार निवडून यावे लागतील. तृणमूल काँग्रेसच्या खासदारांची संख्या किमान पन्नास किंवा त्याहून अधिक हवी. त्याचबरोबर अन्य प्रादेशिक पक्षांनीही ममता दिदींच्या पाठीमागे उभे राहण्याची तयारी दर्शविली पाहिजे. अन्य पक्ष जरी त्यांच्यामागे उभे राहिले, तरीदेखील भाजप किंवा काँग्रेस या दोन्हीपैकी एक राष्ट्रीय पक्ष त्यांच्यामागे उभा राहीला पाहिजे. अशी दुग्धशर्करा असलेली स्थिती निर्माण झाली, तर आणि तरच ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान होण्याची संधी मिळेल.
पश्चिम बंगालमध्ये प्रचंड बहुमत मिळवून भाजपच्या अनेक आमदारांना आपल्या अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस पक्षात घेतल्यानंतर, ममता बॅनर्जी आता दिल्लीवर कूच करण्याच्या तयारीला लागल्या आहेत. मे मध्ये पश्चिम बंगालची निवडणूक जिंकल्यानंतर, जुलैमध्ये त्यांची अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. त्यावेळी, त्या मुख्यमंत्री असल्या, तरी खासदार अथवा आमदार नव्हत्या. तृणमूलचे लोकसभा व राज्यसभेत मिळून 33 खासदार असून, विरोधी पक्षांत काँग्रेसनंतर त्यांचाच पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे.
संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यावर, ममता बॅनर्जी दिल्लीत पोहोचल्या. विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही त्या भेटल्या. मात्र,दुसऱ्यांदा डिसेंबरमध्ये त्या दिल्लीला गेल्या, तेव्हा त्यांनी काँग्रेस नेत्यांना भेटण्याचे टाळले. त्यावेळी मात्र, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
दरम्यानच्या काळात, त्यांनी आसामच्या काँग्रेसच्या नेत्या सुश्मिता देव यांना पक्षात घेत राज्यसभेवर पाठविले. मेघालयात माजी मुख्यमंत्री मुकूल संगमा हे काँग्रेसच्या सतरापैकी बारा आमदारांसह तृणमूलमध्ये दाखल झाले. गोव्याचे माजी मुख्यमंत्री, बिहारचे माजी खासदार, हरियाना, उत्तरप्रदेश, गोव्यातील काँग्रेसचे नेते यांसह काहीजण ममताच्या पक्षात गेले. त्रिपुरात त्यांच्या पक्षकार्यकर्त्यांनी निवडणुकीत जोरदार प्रयत्न केले. याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला. गेल्या महिना दोन- चार महिन्यातील या घटना. अशा वातावरणात ममता बॅनर्जी मुंबईत दाखल झाल्या.
ममता यांच्या वक्तव्याने खळबळ
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद साधल्यानंतर, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत तासभर बैठक घेतली. पवार यांच्या बंगल्याबाहेर ते दोघे पत्रकारांना भेटले. यूपीएच्या नेतृत्वावरून एका पत्रकाराने पवारांना प्रश्न विचारला, त्याच वेळी ममता बॅनर्जी यांनी त्या पत्रकाराला प्रतिप्रश्न विचारला, यूपीए आता कोठे राहिले आहे.
ममता बॅनर्जी यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. काँग्रेस संपली, त्यांच्यात नेतृत्व उरलेले नाही, ते सक्षमपणे मुकाबला करीत नाहीत, असे असंख्य आरोप, दावे प्रतिदावे गेले कित्येक दिवस सर्वदूर होत असताना, ममता दिदीच्या या प्रश्नामुळे अनेक नवीन समिकरणे उदयाला येतात की काय, याची चर्चा रंगली. सर्वच राजकीय पक्षांचे नेते प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. अभ्यासक, विश्लेषकांचे आडाखे, भूतकाळातील घटनांचा मागोवा, भविष्याचा वेध यांचा मारा विविध माध्यमांतून उमटू लागला आहे. अनेक राजकीय पक्षांसमोर या वक्तव्यावरून अडचणी निर्माण झाल्या. त्यांच्या नेत्यांना सारवासारवीची भाषा करीत हालचाली गतीमान कराव्या लागल्या.
तृणमूल काँग्रेस देशाच्या राजकारणात दुसऱया क्रमांकाची जागा घेण्याचा प्रयत्न करीत असताना, त्याचा फटका सध्या भाजपनंतर देशात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसला बसू लागला आहे. त्यामुळे, ममता दिदींच्या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी काँग्रेसने नेते पुढे सरसावले. शरद पवार यांनी नेहमीप्रमाणे दोन्ही बाजूंनी बोलत बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केला.
शिवसेना काँग्रेससोबत
शिवसेनेचे मात्र, त्रेधातिरपीट उडाली. कारण, घटना मुंबईत घडली होती. ठाकरे यांना त्या भेटल्या होत्या. महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार हे काँग्रेसच्या पाठिंबावर टिकलेले आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शिवसेनेने सावध पवित्रा घेतला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत राहूल गांधी यांची भेट घेतली. प्रियांका गांधी यांनाही ते भेटणार आहेत. शिवसेना यूपीएमध्ये प्रवेश करणार, तसेच काँग्रेससोबत उत्तरप्रदेशात आघाडी करणार असल्याचीही चर्चा जोरात सुरू झाली आहे.
बंगालची राजकीय स्थिती
ही राजकीय स्थिती लक्षात घेऊन, ममता बॅनर्जी यांच्या राजकीय हालचालींचा, त्यांच्या वक्तव्याचा मागोवा घेतला पाहिजे. आगामी लोकसभा निवडणूक मे 2024 मध्ये होणार आहे. त्यापूर्वी देशातील महत्त्वाच्या व मोठ्या किमान सहा-सात राज्यात विधानसभा निवडणुका होतील. उत्तरप्रदेशातून सर्वाधिक 80 खासदार निवडून येतात, तेथील विधानसभेची निवडणूक दोन-तीन महिन्यात होईल. महाराष्ट्रातून 48 खासदार निवडून येतात, तेथे तीन विरोधी पक्षांची आघाडी आहे. तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे, ते पश्चिम बंगाल. तेथून 42 खासदार लोकसभेत जातात. तृणमूलचे 22, भाजपचे 18, काँग्रेसचे दोन खासदार 2019 च्या निवडणुकीत निवडून गेले आहेत. 2014 च्या निवडणुकीत तृणमूलचे 42 पैकी 34 खासदार होते. या राज्यात पुन्हा विजय मिळविल्यानंतर, तेथील पक्षाच्या खासदारांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न ममता दिदी करतील. आपल्या राज्याचा नेता पंतप्रधान होणार, असा प्रचार झाल्यास, तृणमूलच्या खासदारांची संख्या वाढेल.
तृणमूल विस्ताराच्या तयारीत
तृणमूल काँग्रेस ईशान्य भारतातील आसाम, त्रिपुरा, मेघालय, तसेच लगतच्या बिहार, उत्तरप्रदेश, ओरिसा, हरियाना, तसेच गोवा या राज्यातून काही जागांवर लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागेल. उत्तरप्रदेशात त्यांची समाजवादी पक्षासोबत युती होण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये पश्चिम बंगाललगतच्या मतदारसंघात त्या लढू शकतील. ओरीसात लढत सोपी नाही. ईशान्य भारतातील एकूण जागाच 25 असल्याने, तिथे फारशी वाढ होण्याची आशा नाही. अशा स्थितीत तृणमूलला पन्नासच्या आसपास जागा जिंकाव्या लागतील.
दक्षिणेत मित्र नाहीत
दक्षीण भारतात ममता दिदीचे फारसे मित्र नाहीत. त्यातच ओरीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे केंद्रातील सत्तेशी वाकडेपणा घेत नाहीत. ते सध्या भाजपच्या विरोधात जात नाहीत. तमिळनाडूत यूपीएतील द्रमुक सत्तेवर आहे. केरळात ममताचे विरोधक डावे पक्ष सत्तेवर आहेत. मुख्यत्वे दक्षीण भारतात कर्नाटक वगळता भाजपलादेखील वाढण्यासाठी फारशी संधी नाही. पण, तेथील राज्यातील पक्ष ममता बॅनर्जीच्या मागे किती येतील, ते निवडणुकीनंतर त्रिशंकू स्थिती झाली तरच ठरेल. त्यातही निकालात कोणत्या पक्षांकडे किती खासदार याच्या संख्याबळावर ठरेल.
हिंदी पट्ट्यात निकाल महत्त्वाचा
खरी लढाई होईल ती हिंदी पट्ट्यात. तेथे विशेषतः गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या चार राज्यात मुख्य लढत होईल ती भाजप व काँग्रेसमध्ये. तेथे राजस्थान व छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेवर आहे. या चार राज्याच्या विधानसभा निवडणुका येत्या दोन वर्षांत होतील. या चार राज्यांतील खासदारांची एकूण संख्या 91 आहे, त्यापैकी भाजपचे 88 जण, तर काँग्रेसचे फक्त तिघेजण निवडून आले. गेल्या वेळी काँग्रेसला अनुकूल स्थिती असतानाही भाजपने जोरदार विजय मिळविला. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची संख्या चांगल्या प्रमाणात वाढल्यास, भाजपचे केंद्रातील एकहाती बहुमत जाईल. भाजपला एनडीएमध्ये फारसे मित्रपक्षही राहिलेले नाहीत. त्यामुळे भाजपच्या खासदारांची संख्या घटल्यास, विरोधकांच्या पक्षनिहाय खासदारांची संख्या मोजावी लागेल.
नशिबाची साथ हवी
लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी 74 वर्षांचे, तर ममता बॅनर्जी 69 वर्षांच्या असतील. त्यामुळे बॅनर्जी यांच्या दृष्टीने ती निवडणूक सर्वांत महत्त्वाची ठरणार आहे. भाजपला हिंदी भाषिक राज्यात सध्याच्या जागा टिकविण्यात अपयश आले, आणि काँग्रेसच्याही जागा फारश्या वाढल्या नाहीत. तर तिसऱ्या आघाडीला संधी मिळेल. या प्रादेशिक पक्षांत सर्वाधिक जागा मिळवित पुढे राहण्याचा प्रयत्न तृणमूल काँग्रेसचा आहे. शेवटी सर्व बाजूनी अनुकूल स्थिती निर्माण झाली, आणि नशिबात असेल तरच ममता दिदी पंतप्रधान होऊ शकतील.