नगर: पुन्हा भाऊ अन् भैय्या राज..! कारभारावर मतदारांच्या विश्वासामुळे घुलेंनी पुन्हा राखली कमांड

नगर: पुन्हा भाऊ अन् भैय्या राज..! कारभारावर मतदारांच्या विश्वासामुळे घुलेंनी पुन्हा राखली कमांड
Published on
Updated on

रमेश चौधरी

शेवगाव तालुका (नगर) : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार घुले बंधूंच्या कारभारावर मतदारांनी पुन्हा एकदा विश्वास दाखविला आहे. माजी आमदार चंद्रशेखर घुले व माजी सभापती डॉ. क्षितिज घुले यांच्या नेतृत्वाखालील ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळाच्या सर्व 18 उमेदवारांच्या गळ्यात मतदारांनी विजयाची माळ टाकली आहे.

शहरातील रेसिडेन्शिअल विद्यालयाच्या मतदान केंद्रावर रविवारी दि.30 रोजी अत्यंत चुरशीने मतदान झाले. त्यामध्ये 2 हजार 187 पैकी 2 हजार 137 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी 4 वाजता मतदान संपल्यानंतर सायंकाळी 5 च्या सुमारास तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीत मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीलाच सहकारी संस्थाच्या निकालात राष्ट्रवादीचे सर्व 11 उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. पाठोपाठ ग्रामपंचायतीचे 4, व्यापारी आडते 2 व हमाल मापाडी मतदारसंघात 1, अशा सर्व 18 जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी मताधिक्याने विजय प्राप्त केला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा प्रणित मंडळात सरळ लढत झाली. सुरुवातीपासूनच तालुक्यातील सेवा संस्था व ग्रामपंचायतींवर असलेले घुले यांचे वर्चस्व पाहता, ही निवडणुक एकतर्फी होणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाच्या आमदार मोनिका राजळे यांना ही निवडणूक करण्याचा निश्चय केला. शिवसेना, मनसे, काँग्रेस यांना सोबत घेत सर्व 18 जागांवर उमेदवार उभे करून खासदार सुजय विखे यांच्या उपस्थितीत मेळावा घेऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणण्याचा प्रयत्न केला.

दोन्ही मंडळाच्या उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. तर, माजी आमदार चंद्रशेखर घुले, सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी गट, गणनिहाय बैठकीतून मतदार, कार्यकर्ते व संस्थाचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क केला. पाथर्डी बाजार समितीच्या निवडणुकीत व्यस्त असतानाही शेवगावकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी आमदार राजळे यांनी घेतली. त्यांनीही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मतदारांशी संपर्क केल्याने भाजपा आघाडीच्या उमेदवारांना 250 ते 300 मतांपर्यंत मजल मारता आली.

तालुक्यातील बहुतांश संस्था घुले बंधूंच्या ताब्यात असल्याने त्यांच्या नेतृत्वावर मतदारांचा विश्वास आहे. चंद्रशेखर घुले यांनी पुन्हा राजकारणात सक्रिय होण्यासाठी शेवगाव येथील मेळाव्यातून एक प्रकारे बाजार समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांत पुन्हा हुरुप आला. त्याचा परिणाम या निवडणुकीतील यशावर झाला.

या निवडणुकीच्या निमित्ताने आगामी काळात होणार्‍या नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा, विधानसभा या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतील मरगळ झटकली असली तरी, भाजपच्या उमेदवारांना मिळालेल्या मतदानाच्या टक्केवारीमुळे संघटनात्मक पातळीवर भाजपला देखील पाठबळ मिळाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news