

तळेगाव दाभाडे : येथील नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षणाची सोडत सोमवारी पार पडली.
सरदार अजितसिंह दाभाडे सरकार व्यापारी संकुलात सोमवारी रजनी जितेंद्र म्हापूसकर व श्वेता अजय कांबळे या विद्यार्थिनींच्या हस्ते आरक्षण सोडत पार पडली. या वेळी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपजिल्हाधिकारी अजय पवार व उपमुख्यधिकारी सुप्रिया शिंदे यांच्यासह तळेगावातील आजी माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगर परिषदेच्या सन 2022 च्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता एकूण चौदा प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये 2 सदस्य आहेत. प्रभाग क्रमांक 3 अनुसूचित जाती महिला, प्रभाग क्रमांक 4 अनुसूचित जमाती महिला तर प्रभाग क्रमांक 10 मध्ये अनुसूचित जातीसाठी एक जागा राखीव ठेवण्यात आली आहे.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या एकूण 14 प्रभागांत सर्वसाधारण महिलांसाठी 12 जागा, सर्वसाधारण गटासाठी 13 जागा तर अनुसूचित जाती महिला 1, अनुसूचित जमाती महिला 1 अनुसूचित जातीसाठी 1 जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणाची सोडत नसल्याने सर्वसाधारण जागांची संख्या वाढली आहे.