

रवी कोपनर
कात्रज : कात्रज जुन्या घाटात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे वाहनचालकांच्या दृष्टीने घाट रस्ता कितपत सुरक्षित आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कात्रज घाट रस्ता डांबरीकरण, तुटलेले सुरक्षा कठडे, दिशादर्शक फलकांचा अभाव, राडारोड्याने तुंबलेली पावसाळी गटारे या समस्या आ वासून उभ्या आहेत. घाटाची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे, मात्र हद्द वन विभागाची त्यामुळे दरड कोसळण्याच्या घटनेला पायबंद कुणी घालावा, या वादात वाहनचालकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे.
पुणे बंगळुरू महामार्गावरील वाढती वाहतूक पाहता 2006 साली कात्रज नवीन बोगद्याची निर्मिती करून नवा मार्ग तयार झाला. मात्र, जुन्या महामार्गावरील वाहतूक कमी झाली नाही. कात्रज जुन्या घाट रस्त्याला राज्य विशेष महामार्गाचा दर्जा देण्यात आला. देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग यांच्याकडे सोपविण्यात आली. देखभाल दुरुस्तीबाबत निधीची तरतूद नाही, असे सांगून या विभागाचे अधिकारी हात वर करतात.त्यात वारंवार घडणार्या अशा घटनांनी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.