मैत्रिणींचा नाद ७५ वर्षांच्या आजोबांना पडला महागात! साडेचार लाखांची फसवणूक
मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मैत्रीसह मनोरंजनासाठी सुंदर तरुणी पुरविण्याच्या नावाने एका ७५ वर्षांच्या वयोवृद्धाची अज्ञात महिलेने सुमारे साडेचार लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. या वयोवृद्धाच्या तक्रारीवरुन शालिनी नावाच्या महिलेविरुद्ध समतानगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
एका खासगी कंपनीतून निवृत्त झालेले तक्रारदार हे त्यांच्या पत्नीसोबत कांदिवली परिसरात राहतात. २३ मार्चला त्यांना एका अज्ञात मोबाईलवरुन एक मॅसेज आला होता. त्यात मैत्रीसह मनोरंजनासाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले हेते. त्यानंतर याच मोबाईलवरुन त्यांना एका महिलेचा कॉल आला होता. तिने स्वतःचे नाव शालिनी सांगून मनोरंजन करण्यासाठी काही सुंदर तरुणी पुरविल्या जातील असे सांगितले.
त्यांनी होकार दर्शविल्यानंतर तिने त्यांच्याकडे व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील करुन घेण्यसाठी दोन हजार रुपयांची मागणी केली. त्यांनीही तिला ही रक्कम पाठवून दिली. त्यानंतर तिने त्यांना एका व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये सामील करुन सात तरुणीचे फोटो पाठविले होते. त्यापैकी एका तरुणीला त्यांच्यासोबत मैत्री करुन त्यांच्यासोबत मनोरंजनासाठी पाठविले जाईल असे सांगितले. यावेळी शालिनीकडून त्यांना सर्व्हिस चार्ज, रुम बुकींगसह विविध कारणे सांगून पैशांची मागणी करण्यात आली होती.
२३ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत त्यांनी तिला सुमारे साडेचार लाख रुपये पाठवून दिले होते. मात्र त्यांनी निवड केलेल्या तरुणीसोबत त्यांची मैत्री करुन दिली नाही. त्यामुळे त्यांनी शालिनीकडे दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली. तिने त्यांना काहीच प्रतिसाद दिला नाही.

