राक्षस बाटलीत बंद!

राक्षस बाटलीत बंद!
Published on
Updated on

खलिस्तान समर्थक कट्टरपंथी अमृतपाल सिंगला झालेल्या अटकेबद्दल पंजाब पोलिसांचे अभिनंदन करायचे की, एका गुन्हेगाराने संबंध पोलिस दलाला 35 दिवस पळवले त्याबद्दल खेद व्यक्त करायचा? त्यातही पुन्हा अमृतपालला अटक झाली की त्याने आत्मसमर्पण केले, याबाबतचा संभ्रम आहे तो वेगळाच! पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील रोडे गावात त्याच्यावर झालेली ही कारवाईसुद्धा अमृतपालच्या द़ृष्टीने प्रतीकात्मक म्हणावी लागेल. गेले काही महिने तो जी विभाजनवादी भूमिका घेऊन विद्वेष पसरवण्याचे काम करत होता, ती भूमिका मूळची जर्नेलसिंग भिंद्रनवाले याची आणि जिथे कारवाई झाली ते गाव भिंद्रनवाले याचे.

भिंद्रनवालेचे वारस असल्याचे भासवण्याचा त्याचा प्रयत्न पंजाब पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे यशस्वीही होताना दिसत होता. गेल्यावर्षी याच गावातील कार्यक्रमात 'वारिस पंजाब दे' संघटनेच्या प्रमुखपदाची सूत्रे त्याने स्वत:कडे घेतली. मुख्यमंत्री भगवंत मान म्हणत असले की, आम्ही त्याला पूर्वीच अटक करू शकलो असतो. परंतु, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कारवाई टाळली, त्या म्हणण्याला काडीचा अर्थ नव्हता. एखाद्या चित्रपटाच्या नायकाप्रमाणे त्याने पोलिसांना पस्तीस दिवस पळवले. तो पोहोचला तिथे पोलिस नंतर पोहोचले. पोलिसांपेक्षा तो हुशार असल्याचे चित्र निर्माण झाले आणि या भस्मासुराची प्रतिमा त्याच्या समर्थकांमध्ये उंचावत गेली.

पोलिस मागावर असताना त्याने व्हिडीओ संदेश व्हायरल करून पोलिसांना आव्हान दिले. या काळातली दिलासादायक एकच गोष्ट म्हणजे अकाल तख्तने अमृतपालला आश्रय नाकारला. अकाल तख्तमार्फत समर्पण नाकारून एका गुन्हेगाराच्या उदात्तीकरणाला प्रोत्साहन दिले नाही. खलिस्तानवादाची ही विषवल्ली वाढत असताना अकाल तख्तने घेतलेल्या स्पष्ट भूमिकेने या गंभीरविषयी चिंतेची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली, असे म्हणता येईल. त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (रासुका) कारवाई करण्यात आली, आसाममधील दिब्रुगढ येथील कारागृहात त्याची रवानगीही झाली. अटकेनंतर लगेचच, एक ध्वनिचित्रफीत प्रसारित करत त्याने आत्मसमर्पण करत असल्याचे सूचित करून नवा डाव खेळण्याचा प्रयत्न केला. 'आपण आयुष्याच्या निर्णायक वळणावर उभे आहोत.

महिन्याभरापूर्वी सरकारने शिखांवर अत्याचार केला. फक्त माझ्या अटकेचा प्रश्न असता, तर मीही सहकार्य केले असते. या भौतिक जगातील न्यायालयात मी दोषी असू शकतो. परंतु, सर्वशक्तिमान ईश्वराच्या न्यायालयात मी दोषी नाही. ही अटक म्हणजे शेवट नाही, तर सुरुवात आहे,' असा दावाही तो या चित्रफितीतून करतो. पोलिसांनी मात्र त्याच्या आत्मसमर्पणाचा हा दावा फेटाळला. अमृतसर आणि पंजाब पोलिसांच्या गुप्तचर शाखेने अटकेची संयुक्त मोहीम राबवली. ज्या गुरुद्वारामध्ये अमृतपाल लपला, त्याचे पावित्र्य राखणे आवश्यक असल्याने गणवेशधारी पोलिसांनी आत प्रवेश केला नाही. अटकेतील सहकार्‍यांची सुटका करण्यासाठी त्याच्या समर्थकांनी अजनाला पोलिस ठाण्यावर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी फरारी अमृतपालविरुद्ध कारवाई सुरू केली. तो 18 मार्चपासून फरारी होता.

पंजाब हे सीमेवरचे राज्य अधिक संवेदनशील. इथे पुन्हा फुटीरतावादाची बीजे पेरण्याचे काम अमृतपाल करीत होता, ते अधिक चिंताजनक होते. संबंधित विषय नीट समजून घेण्यासाठी प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे. 'वारिस पंजाब दे' ही संघटना पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याने स्थापन केली. दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाच्या काळात 26 जानेवारीला लाल किल्ल्यावर खालसा पंथाचा झेंडा निशाण साहिब फडकावून वातावरण बिघडवण्यास कारणीभूत ठरलेला दीप काही महिन्यांनी एका रस्ते अपघातात ठार झाला. त्यानंतर अमृतपाल सिंगने 'वारिस पंजाब दे' संघटनेवर कब्जा केला आणि खलिस्तान समर्थकांचे संघटन सुरू केले. अमृतसर जवळच्या अजनालामध्ये दीड महिन्यापूर्वी संघटनेच्या समर्थकांनी पोलिस ठाण्यावर हल्ला केला. त्याचा सहकारी लवप्रीत सिंग तुफान याला पोलिसांनी अटक केली, त्याच्या सुटकेच्या मागणीसाठी हजारोंचा सशस्त्र जमाव ठाण्यावर चाल करून गेला. त्यावेळी पोलिसांशी झटापटीत अधिकार्‍यासह सहा पोलिस जखमी झाले. स्वतः अमृतपाल सिंगने त्या हिंसक जमावाचे नेतृत्व केले.

त्याने पोलिसांना अल्टिमेटम देऊन समर्थकांसह इतका गोंधळ घातला की, लवप्रीत सिंग तुफान याची सुटका करण्याचे आश्वासन देणे पोलिसांना भाग पडले. 'वारिस पंजाब दे' संघटनेची स्थापना 30 डिसेंबर 2021 रोजी झाली, म्हणजे या संघटनेचे वय अवघे सव्वा वर्ष! अल्पावधीत मोठ्या संख्येने तरुण या संघटनेशी जोडले गेले. पंजाबच्या हक्कांसाठीची लढाई पुढे नेण्यासाठी संघटनेची स्थापना केल्याचा दीप सिद्धूचा दावा होता. विधानसभा निवडणुकीच्या काळात त्याने सिमरनजितसिंग मान यांच्या खलिस्तान समर्थक पक्षाला पाठिंबा दिला. परंतु, निवडणुकीच्या काही काळ आधी 15 फेब्रुवारी 2022 रोजी हरियाणामध्ये एका रस्ते अपघातात तो ठार झाला. याच सुमारास अमृतपाल सिंग दुबईहून भारतात परतला आणि त्याने 'वारिस पंजाब दे' नावाची वेबसाईट बनवून लोक जोडण्याचे काम सुरू केले. त्याच जोडीला संघटनेचा प्रमुख म्हणून स्वतःच्या नावाचे प्रमोशन करू लागला.

आक्रमक भाषेमुळे अनेक तरुण त्याच्याकडे आकर्षित झाले आणि त्यातूनच संघटना वाढत गेली. संघटनेच्या प्रमुखपदी निवड झाल्यानंतर त्याने भिंद्रनवालेच्या गावात एक मेळावा आयोजित करत हजारो लोक जमवले आणि तेथे खलिस्तान झिंदाबादच्या घोषणाही दिल्या. याचवेळी त्याने स्वतःला संघटनेचा प्रमुख म्हणून घोषित केले. पंजाबच्या भूमीत पुन्हा भिंद्रनवालेचे दहशतवादी विचार रुजवण्याचा प्रयत्न होऊ लागला. त्यामुळे देशाच्या एकात्मतेला मोठा धोका निर्माण झाला होता. अमृतपालला अटक झाली म्हणजे हा फुटीरतावादाचे विष ओकणारा राक्षस बाटलीत बंद केला गेला. तो पुन्हा बाटलीतून बाहेर येणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news