अमरावती; पुढारी वृत्तसेवा : परतवाडा ते चिखलदरा मार्गावर पर्यटकांची कार २०० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. तर चाैघे जण गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना मडकी गावानजीक आज (दि. १७) सकाळी घडली. सर्व पर्यटक तेलंगणा राज्यातील आहेत.
पर्यटक कार ( क्र. एपी २८ डीडब्ल्यू २११९) ने चिखलदरा येथे जात होते. आज (दि. १७) सकाळी मडकी गावानजीक त्यांची कार अचानक दोनशे फूट दरीत कोसळली. कार चालक शेख सलमान शेख चांद (वय २८), शिवाकृष्णा सुधरमा अदांकी (वय ३१), वैभव लक्ष्मणा गुल्ली (वय २९), वानापारथी कोटेश्वर राव (वय २७) हे जागीच ठार झाले. तर जी. श्यामसुंदर लिंगा रेड्डी (वय ३०), के. सुमन काठिका (वय २९), के. योगेश यादव (वय ३०), हरिष मुथिनेनी (वय २७) हे गंभीर जखमी झाले आहेत.
चिखलदरा पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य राबवले. जखमींना अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी के. सुमन कठिका आणि के. योगेश यादव यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. पर्यटक तेलंगणातील आदिलाबाद येथील द्वारकानगर भागातील रहिवासी असून, ते तेलंगणा ग्रामीण बँकेचे कर्मचारी आहेत. दाट धुक्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा