मराठी सिनेसृष्टीत सातत्याने वेगळ्या धाटणीच्या आणि आशयपूर्ण कथा प्रेक्षकांसमोर येत असतात. याच प्रवाहात आता रहस्य, भावना, नाती आणि भूतकाळ-वर्तमानातील गुंतागुंत यांची सांगड घालणारा ‘संडे १९९६’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काळाच्या अनपेक्षित वळणांमुळे आयुष्यात घडणारे बदल या कथेतून मांडण्यात आले आहेत.
व्ही.आर.के. फिल्मसची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती नीलांबरी विक्रांत यांनी केली आहे. जीवन राजेंद्र चव्हाण यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. ओंकार राऊत, गणेश यादव, पंकज विष्णू, सुनील गोडबोले, शिवानी बने, सायली पाचपुते आणि गौरवी महांगडे हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
‘संडे १९९६’च्या पोस्टरचे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. पोस्टरमधून चित्रपटाच्या रहस्यमय कथानकाची झलक दिसते. चित्रपटाच्या संकल्पनेविषयी निर्मात्या नीलांबरी विक्रांत यांनी सांगितले की, ‘संडे १९९६’च्या माध्यमातून केवळ रहस्यकथा सादर करण्याचा उद्देश नाही. काळाचा माणसाच्या आयुष्यावर होणारा परिणाम, नात्यांची गुंतागुंत आणि भूतकाळाची वर्तमानाशी असलेली नाळ यांचा वेगळ्या पद्धतीने वेध घेण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.
दिग्दर्शक जीवन चव्हाण यांच्या मते, कथेतलं गूढ शेवटपर्यंत कायम ठेवताना त्यामागच्या भावनिक नात्यांनाही तितकाच न्याय देणे हे मोठे आव्हान होते. प्रेक्षकांनी फक्त पडद्यावर कथा पाहण्याऐवजी तिच्यातील प्रत्येक प्रसंग आणि भावना प्रत्यक्ष अनुभवाव्यात, अशी टीमची भूमिका आहे.
कोकणाची पार्श्वभूमी वाढवणार रहस्याची रंगत
चित्रपटाला लाभलेली कोकणाची निसर्गरम्य पार्श्वभूमी ही त्याची विशेष जमेची बाजू आहे. कोकणातील हिरवाई, समुद्र आणि शांत वातावरण जितके आकर्षक आहे, तितक्याच त्याच्या कुशीत अनेक गूढ गोष्टी दडलेल्या असल्याची भावना या चित्रपटातून निर्माण केली जाणार आहे. याच निसर्गाचा आणि वातावरणाचा कथानकाला पूरक असा वापर करण्यात आला आहे. काळाचं चक्र जेव्हा उलट दिशेने फिरतं, तेव्हा वर्तमानात जगणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होतो, या मध्यवर्ती विचारावर ‘संडे १९९६’ची कथा आधारलेली आहे.