Latest

‘हर घर तिरंगा’ला महावितरणची साथ, वीजबिलाच्या माध्यमातून लाखो घरांत पोहोचवला तिरंगा

गणेश सोनवणे

धुळे : पुढारी वृत्तसेवा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर विविध उपक्रम राबविले जात आहेत. संपूर्ण देश 'हर घर तिरंगा' मोहिमेला साथ देत आहे. त्यात महावितरणही मागे नाही. महावितरणने तर ऑगस्ट महिन्यातील सर्व वीजबिलांवर 'हर घर तिरंगा'चे स्टीकर्स चिकटवून प्रत्येक घरात तिरंगा पोहोचविला आहे.

मुंबईतला काही भाग वगळला तर चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक घरात महावितरणची वीज आहे. त्यामुळे एक प्रकारे प्रत्येक घरात तिरंगा पोहोचविण्याचे कामच महावितरणने केले आहे. जुलैअखेर राज्यात महावितरणचे एकूण 2 कोटी 88 लाख 28 हजाराहून अधिक ग्राहक आहेत. यामध्ये घरगुती 2 कोटी 15 लाख 43 हजार, वाणिज्यिक 20 लाख 56 हजार, औद्योगिक 3 लाख 96 हजार, शेतीपंपाचे 44 लाख 25 हजार याशिवाय उर्वरीत इतरही ग्राहकांचा समावेश आहे. वीज व विजेचे बिल दोन्ही कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आहेत. प्रत्येकाच्या घरात वीजबिल फाईल संग्रही असतेच. त्यामुळे महसुली पुरावा म्हणून ग्राह्य नसतानाही बँका एखाद्याला मालमत्तेचा जिवंत पुरावा म्हणून लाईटबिल मागतात. विजेचा युनिटमधील वापर त्या कुटुंबाचा आर्थिक स्तरसुद्धा ठरवते.

केंद्र सरकारलाही वीजबिल हे प्रत्येक घराघरांत तिरंगा पोहोचविण्यासाठी अतिशय उत्तम माध्यम वाटले. जसे निर्देश केंद्राकडून मिळाले, तोच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी तातडीने पावले उचलत सर्व वीजबिलांवर तिरंगा लावण्याचे ठरवले. अन् अवघ्या काही दिवसांत त्या-त्या भागातील 'बिलिंग सायकल'नुसार प्रत्येकाच्या घरी तिरंगा पोहोचविण्याचे काम महावितरणने केले आहे. भविष्यात हे वीजबिल पाहून प्रत्येकाची अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाची आठवण नक्कीच जागी होईल.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT