पुणे : पुढारी वृत्तसेवा: नवीन शैक्षणिक वर्ष सोमवारपासून सुरू झाले असले, तरी शहरातील प्रत्यक्ष शाळांची घंटा बुधवारी वाजत आहे. विद्यार्थी शाळेत दाखल होणार आहेत. विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी शाळास्तरावर उत्साही नियोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी डोरेमॉन, छोटा भीम असे पात्र; तर गुलाबपुष्प, मिठाई वाटप करून चिमुकल्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील शाळा सज्ज असल्याची माहिती विविध शाळांच्या मुख्याध्यापकांनी दिली आहे.
सोमवारपासून सुरू झालेल्या शाळांमध्ये स्वच्छता आणि विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्याच्या हेतूने शाळांमध्ये मुलांना बुधवारपासून दाखल करून घ्यावे, असे आदेश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते. त्यानुसार बुधवारपासून मुले शाळेत येत असल्याने शाळा गजबजून जाणार आहेत. कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
त्यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. कोरोनाबाधित शिक्षक किंवा विद्यार्थी शाळेत येऊ नयेत, यासाठी नियोजन केले आहे. नवविद्यार्थ्यांचे शाळेत प्रथमच आगमन होणार असल्याने त्यांना शाळेची ओढ लागावी, शाळेबद्दल त्यांच्यात आपुलकी निर्माण व्हावी, यासाठी प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यांना मिठाई दिली जाणार आहे. यासाठी पालक, माजी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती यांचेही सहकार्य घेण्यात येणार आहे.
आजपासून राज्यातील शाळा सुरू होत असून, अनेक बालकांचे 'पहिले पाऊल' औपचारिक शिक्षणप्रवाहात पडणार आहे. हे पाऊल जितके दमदार, आनंदी, उत्साही आणि कृतियुक्त पडेल तितकी शालेय शिक्षणाची अभिरुची वृद्धिंगत होणार आहे. या अनुषंगाने कोरोनाच्या नकारात्मक कालावधीला मागे सारून शालेय शिक्षण विभागाने बालकांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत.
वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री
राज्यात 5 कोटी 38 लाखांहून अधिक पुस्तके वितरित…
राज्यातील पहिले ते आठवीपर्यंतच्या अनुदानित शाळांमधून विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात आली आहेत. याअंतर्गत 82 हजारांहून अधिक शाळांमधून 5 कोटी 38 लाखांहून अधिक पुस्तके वितरित करण्यात आली आहेत. जिल्हा परिषदेच्या पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी दोन गणवेश खरेदी करण्यात आले आहेत. याचबरोबर नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी नजीकच्या दगडखाणी, वीटभट्टी, बाजारपेठा, पदपथ, कामगारवस्त्या अशा ठिकाणी सर्वेक्षण करून शाळा परिसरातील 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याची खात्री केली जाणार आहे.