सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : टेंभूर्णी येथील एका अज्ञान वाहनाच्या धडकेत पाच वर्षांच्या नर बिबट्याच्या मृत्यू झाला. ही घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली. मृतदेह टेंभुर्णी जवळील शिराळ गावच्या शिवारात आढळला. मृत बिबट्याच्या नख्या, दात, मिशा सुस्थितीत होत्या. रस्ता अपघातामध्ये बिबट्याचा मृत्यूमुखी पडण्याची जिल्ह्यातील पहिलीच दुर्घटना आहे.
टेंभुर्णी-पुणे शिराळ गावच्या शिवारात दत्तात्रय लोकरे यांच्या शेतातील मक्याच्या पिकामध्ये मृतदेह आढळला. उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनी आहे. महामार्गाच्या डावीकडील पिकामधून उजवीकडे जात असताना रात्रीच्या दरम्यान बिबट्याला अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. बिबटाच्या उजव्या मांडीचे हाड तुटले असून अंगावर, छोट्या-मोठ्या जखमा आहेत. मागील दोन-तीन दिवस लोकरे त्यांच्या शेतामध्ये आले नव्हते. शुक्रवारी दुपारी पिकाची पाहणी करत असताना त्यांना मक्यामध्ये बिबट्या झोपलेल्या अवस्थेत दिसला. बिबट्या पाहताच घाबरले. पण, त्याच्या काहीच हालचाली न दिसल्याने त्यांनी पोलिस व वन विभागास याबाबत माहिती दिली.
माढा, पिंपळनेर व सोलापुरातील पशुवैद्यकीय अधिकार्यांच्या पथकाने घटनास्थळावर धाव घेतली. उजव्या पायाची हाडे तुटल्याचे आढळले. दोन-तीन दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असल्याची शक्यता पशुवैद्यकीय अधिकार्यांनी व्यक्त केली. राखीव वनक्षेत्रात पंचाची साक्ष नोंदवून वन विभागाने त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
सहाय्यक उपवनसंरक्षक लक्ष्मण आवारे, मानद वन्यजीव रक्षक भरत छेडा, वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश उटगे यावेळी उपस्थित होते. बिबट्याचा अपघातामध्ये मृत्यू होण्याची जिल्ह्यातील पहिलीच दुर्घटना आहे.
वन विभागाची शोध मोहीम
रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक बसल्याने बिबट्याचा मृत्यू झाला. आणि त्याचा व्हिसेरा पुढील तपासणीसाठी नागपूर येथील वन विभागाच्या प्रयोगशाळेत व हैदराबाद येथील 'पीसीएमबी'राष्ट्रीय प्रयोगशाळेत पाठवण्यात येईल. मागील अनेक दिवसांपासून बिबट्या त्या परिसरात वावरतोय. पण, लोकांवर हल्ला केल्याचे आढळले नाही. तसेच काही भागातील पाळीव प्राणी मारल्याच्या तक्रारी होत्या.
– सतीश उटगे, वनपरिक्षेत्र अधिकारी, मोहोळबिबट्याच्या मृतदेहाची तपासणी केली. नख, दात, मिशा सुस्थितीत होत्या. पायाचे मागील हाड तुटले असून पोटामध्ये मार, जखमा दिसून आल्या.
– डॉ. सागर कदम, पशुवैद्यकीय अधिकारी, पिंपळनेर (माढा)
हेही वाचा