Latest

सूर्याच्या फलंदाजीने झोप उडवली : विराट कोहली

Arun Patil

दुबई ; वृत्तसंस्था : सूर्यकुमारला मी अनेकदा खेळताना पाहिले आहे; परंतु नॉनस्ट्रायकर एंडवरून त्याला पहिल्यांदाच खेळताना पाहत होतो, त्याच्या खेळाने माझी पूर्णपणे झोप उडवली, अशा शब्दांत विराट कोहलीने सूर्यकुमार यादवच्या हाँगकाँगविरुद्धच्या फलंदाजीचे कौतुक केले आहे. कधी काळी आयपीएलमध्ये त्याला टशन देणारा विराट कोहली सूर्याच्या खेळीसमोर नतमस्तक झाला.

भारतीय स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची झंझावाती खेळी आणि माजी कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने हाँगकाँगविरुद्ध शानदार विजयाची नोंद केली. सूर्यकुमारने 26 चेंडूत 68 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान सूर्यकुमारचा स्ट्राईक रेट 261.53 होता. त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. कोहलीने सावध खेळ करत सामन्यात 44 चेंडूंत 59 धावांची खेळी केली. दोघेही नाबाद राहिले; पण विशेष बाब म्हणजे या खेळीत सूर्यकुमारने दमदार फटकेबाजी केली. त्यानंतर विराट कोहली याने सूर्यकुमारवर स्तुतिसुमने उधळली.

विराट कोहलीने 'बीसीसीआय डॉट कॉम'वर सूर्यकुमार यादवची मुलाखत घेतली. यादरम्यान विराट कोहलीने सांगितले की, सूर्यकुमार यादवच्या खेळाने माझी पूर्णपणे झोप उडवली. मी आज सूर्यकुमारची मुलाखत घेत आहे याचा मला अभिमान आहे. या सामन्यात त्याने शानदार खेळी केली आहे. मी दुसर्‍या बाजूला उभा राहून त्याच्या डावाचा आनंद घेत होतो. त्याने धमाकेदार खेळी खेळून संपूर्ण माहोलच बदलून टाकला. खरे सांगायचे, तर खेळपट्टी फलंदाजीला तितकीशी चांगली नव्हती; पण अशा स्थितीत सूर्याने उत्कृष्ट खेळी खेळली, असे विराट म्हणाला.

विराट कोहली म्हणाला, मी तुला आयपीएल आणि टीम इंडियामध्ये खेळताना अनेकदा पाहिले आहे; पण आज पहिल्यांदाच तुझी खेळी खूप जवळून पाहिली. मी पूर्णपणे अवाक् झालो. मी तुला समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. खेळ कसा पुढे न्यायचा याची तुझ्या मनात एक योजना ठरलेली होती. तू पण माझ्याशी बोलत होतास. आपण जसे खेळलो आणि जशी चर्चा केली, त्या सगळ्या गोष्टींबद्दल तुझे काय मत आहे, असे कोहलीने सूर्याला विचारले. यावर सूर्यकुमार म्हणाला, सर्वप्रथम मी सांगतो की, मला तुझ्यासोबत फलंदाजी करायला आवडते.

ड्रेसिंग रूममध्ये बसून ऋषभ पंत आणि आम्ही रणनीतीबद्दल बोलत होतो. खेळपट्टी अतिशय संथ असल्याचे आम्हाला माहीत होते. मी जेव्हा फलंदाजीला आलो तेव्हा माझा आवडता खेळ खेळण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला. आल्यापासूनच मी फटके मारायला सुरुवात केली. प्लॅन अगदी सोपा होता की, चेंडू सीमारेषेपार पोहोचवायचा. त्यात तुझ्यासारखा महान फलंदाज दुसर्‍या बाजूला उभा असल्याने मला खेळ खेळणे अधिक सोपे गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT