शिराळा : पुढारी वृत्तसेवा : शिराळा तालुक्याच्या रिळे गावातील गावचे प्रसाद काळे हे कामानिमीत्त ग्रामपंचायत कार्यालयात आले होते. या दरम्यान त्यांची आणि उपसरपंच बाजीराव पांडूरंग सपकाळ यांच्याशी कामावरून किरकोळ बाचाबाची झाली. यात उपसरपंच सपकाळ यांनी काले यांना जातीवाचक शिवीगाळ केली. यावेळी तिथे ग्रामपंचायतीच्या बाहेर दुसऱ्या कामानिमीत्त आलेल्या संजय ज्ञानदेव आढाव, योगेश संजय आढाव, दीपाली संजय आढाव यांनी काळे यांनी मारहाण केल्याची तक्रार देण्यात आली आहे.
आढाव बंधुनी मारहाणीत सोन्याची चेन, मोबाईल व रोख रक्कम असा ४७ हजार ५०० रुपयेचा ऐवज चोरल्याचा शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटना (दि.१६) सप्टेंबर रोजी दुपारी १ च्या दरम्यान घडली मात्र फिर्यादी दवाखान्यात उपचारासाठी दाखल असल्याने आज (दि.२४) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत शिराळा पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी प्रताप राजाराम काळे यांनी आपण या अगोदर घरकुल योजनेच्या गैरव्यवहाराबाबत लेखी तक्रार दिली होती त्याच्या चौकशीसाठी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बोलवण्यात आले होते.
सदर चौकशी पूर्ण झालेनंतर कार्यालयातून बाहेर पडल्यावर संजय आढाव, योगेश आढाव, दीपाली आढाव यांनी लाथाबुक्क्यांनी, लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले.
तसेच गळ्यातील एक तोळ्याची चेन, रोख ५ हजार ५०० रुपये, मोबाईल असा ४७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरल्याचे सांगितले. या दरम्यान उपसरपंच बाजीराव सपकाळ याने जातीवाचक शिवीगाळ केली असल्याची फिर्याद दाखल केली.
या घटनेतील उपसरपंच बाजीराव सपकाळ याचे विरुद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्याबद्दल तर इतर तिघांच्या विरुद्ध मारहाण करून ऐवज चोरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधीक्षक कृष्णात पिंगळे हे करीत आहेत.