नवी दिल्ली : 35 वर्षांच्या रोहित शर्माच्या खांद्यावरील भार थोडा कमी केला पाहिजे, त्यामुळे त्याची टी-20 कर्णधारपदाच्या कार्यातून मुक्तता केली पाहिजे, असे वक्तव्य भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने केले आहे. रोहित शर्मा दुखापती आणि वर्कलोड मॅनेजमेंटमुळे भारताच्या सगळ्या सामन्यांत कर्णधार म्हणून उपस्थित राहू शकलेला नाही.
याबाबत 'पीटीआय'शी बोलताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, जर टी-20 साठी भारतीय संघ व्यवस्थापनाच्या मनात अजून कोणी असेल तर मला असे वाटते की, रोहित शर्माला या कार्यभारातून मुक्त करून दुसर्या व्यक्तीला टी-20 संघाचे कर्णधारपद द्यायला हवे.
सेहवाग म्हणाला की, एक म्हणजे यामुळे रोहित शर्माला त्याचे वय पाहता त्याच्या वर्कलोड मॅनेजमेंट आणि मानसिक थकव्यावर चांगले काम करता येईल. दुसरे म्हणजे जर टी-20 संघासाठी दुसरा कर्णधार नियुक्त केला, तर रोहित शर्माला टी-20 मधून ब्रेक घेणे सोपे जाईल आणि त्याला कसोटी आणि वन-डेसाठी चांगल्या प्रकारे तयारी करता येईल.
मात्र, वीरेंद्र सेहवाग हेही सांगायला विसरला नाही की, जर संघ व्यवस्थापनाने भारताच्या तिन्ही प्रकारांत एकच कर्णधार असावा असे ठरवले असेल, तर रोहित शर्माशिवाय दुसरा चांगला पर्याय सध्या तरी समोर दिसत नाही. भारतीय थिंक टँक जर एकच व्यक्ती भारताच्या तिन्ही प्रकारांतील संघाचा कर्णधार असेल या योजनेनुसारच जाणार असेल, तर मला असे वाटते की, रोहित शर्माच यासाठी योग्य व्यक्ती आहे.