Latest

विधानभवन : गिरीशभौंची डुलकी आणि फडणवीसांची पोटतिडीक!

backup backup

कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा किंवा लक्षवेधी असली की, विधानभवन असो वा विधान परिषद, सभागृहातलं वातावरण एकदम बदलून जातं. विरोधी पक्षाच्या आमदारांना एक तर यानिमित्ताने आपापल्या मतदारसंघातल्या गुंड-गुन्हेगारांचा पर्दाफाश करतानाच मतदारांच्या पोलिसांबद्दलच्या तक्रारी सभागृहात मांडून गृह खात्यावर तोंडसुख घेता येतं. शिवाय, आपलं न ऐकणार्‍या अधिकार्‍यांचे हिशेबही चुकवता येतात. अर्थात, बहुतेकदा पोलिसी अत्याचार आणि गुन्हेगारी याला वाचा फुटून न्यायही मिळतो!

आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बीडमधील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या गोळीबार प्रकरणावरून राज्य सरकारला धारेवर धरलं. जिल्हाधिकारी कार्यालयात गोळीबार होतोच कसा? असा सवाल करत फडणवीसांनी सरकारवर हल्लाबोल केला. सत्तारूढ पक्षाशी संबंधित पदाधिकारी भर गर्दीच्या ठिकाणी गोळीबार करतात, यातच सगळे आले, असं फडणवीस म्हणाले.

कायदा आणि सुव्यवस्थेवर अत्यंत पोटतिडीकेने टीका करत असतानाच त्यांच्याच मागच्या बाकावर बसलेले माजी मंत्री गिरीश महाजन मात्र मस्तपैकी डुलकी घेत होते. एक तर हल्ली उन्हाळा प्रचंड वाढलाय. त्यात दुपारी जेवणानंतर चर्चा… मग जरा डोळा लागणारच, हे खरेच; पण पुढच्या बाकावरून फडणवीस तावातावाने सरकारवर हल्ला चढवत असताना महाजनांची ही डुलकी सभागृहातल्या कॅमेर्‍याने नेमकी टिपली.

गंमत अशी की, महाजन डुलक्या घेताना मस्त डोलत होते, हे आशिष शेलारांच्या लक्षात आल्यावर त्यांनी गिरीशभौंना जागं केलं. इथपर्यंत ठीक होतं, महाजन खडबडून जागे झाले आणि त्यांनी सभागृहात काय चाललेय हेदेखील न विचारता हात वर करून ओरडायला सुरुवात केली. ही गंमत मग लगोलग व्हायरलदेखील झाली. गिरीशभौंना नंतर सहकार्‍यांच्या टिंगलटवाळीला तोंड देता देता नाकी नऊ आले होते!

केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनीही बीडच्या सुरक्षा व्यवस्थेवर ताशेरे ओढताना स्वतःचा अनुभव कथन केला. बीड जिल्ह्यात पोलिसांचा धाक राहिलेला नाही. बीड जिल्ह्यातील पोलिसांचा दारू विक्री, मटका या बेकायदा धंद्यांत पूर्णपणे सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत त्यांनी स्वतःला आलेला अनुभवही कथन केला.

कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भातील दुसरा प्रश्न होता अमरावतीचा! शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर बसविलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पोलिस व मनपा प्रशासनाकडून काढून टाकण्यात आल्याने, अमरावतीमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. शिवाय, मनपा आयुक्तांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकारदेखील घडला होता. याप्रकरणी आमदार रवी राणा यांच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज आमदार रवी राणा यांनी सविस्तर भूमिका मांडली. तसेच गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांनी पोलिसांवर दबाव टाकून आपल्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यास सांगितलं असल्याचा आरोप केला. आपल्याकडे याबाबतचा पुरावाच पेनड्राईव्हमध्ये असून, आपला आरोप खोटा ठरला तर आपल्याला विधानभवनातच फासावर लटकवा, असे वक्तव्य राणा यांनी केले.

आज राज्याला आर. आर. पाटील यांच्यासारखा गृहमंत्री हवा होता, असे सांगतानाच या राज्यात जर तुम्ही वाझेसारखे गुन्हेगार अधिकारी निर्माण कराल, तर तुमचीदेखील अनिल देशमुख यांच्यासारखी अवस्था होईल, असा इशाराही राणा यांनी दिला! (विधानभवन)

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात येणार असल्याने सर्वच जण ते काय बोलतात हे ऐकण्यासाठी उत्सुक होते. मात्र, ही चर्चाच गोंधळात पार पडल्याने उत्तर झालेच नाही आणि मुख्यमंत्र्यांची सभागृहवारी झालीच नाही. ही चर्चा झाली असती, तर राज्यपालांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर पुन्हा एकदा टीका करण्याची संधी आघाडीच्या आमदारांना मिळाली असती, म्हणूनच भाजपच्या आमदारांनी चर्चाच होऊ दिली नाही, असे आघाडीचे आमदार सभागृहाबाहेर बोलत होते! (विधानभवन)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT