Latest

लग्नाच्या मंडपात नवऱ्याला येण्यास उशीर; होणाऱ्या बायकोने त्याच मांडवात ‘दुसरा’ शोधला !

अमृता चौगुले

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : आधिच वऱ्हाड उशिरा आले, त्यात नाचणा-या मुलांनी नवरदेवाच्या वरातीला कमालीचा विलंब केल्यामुळे संतप्त झालेल्या वधूपक्षाने नवरदेवासह अख्ख्या वऱ्हाडाची धुलाई करून भर मंडपातून हाकलले आणि ऐनवेळी दुसराच सुयोग्य वर शोधून त्याच्याशी वधुचे लग्न लावून दिले. बेपर्वाईमुळे नामुष्की ओढवलेल्या वऱ्हाडाचीच सर्वत्र चर्चा होत आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील कंडारी गावच्या एका तरूणाचा मलकापूर पांग्रा (जि. बुलढाणा) येथील मुलीशी रिवाजाप्रमाणे विवाह ठरला. 22 एप्रिल रोजी दुपारचा मुहूर्त नियोजित होता. वधूपक्षाने विवाह सोहळ्याची जय्यत तयारी केली होती. वधूपक्षाकडील मंडळी व पाहुणे मंडपात हजर होते. परंतु, वराकडील वऱ्हाड मात्र दुपारनंतर दाखल झाले. विवाह मुहूर्त टळून गेला. त्यानंतरही वरातीला धिमेपणाने सुरूवात झाली. बॅन्डबाजासमोर बेधुंद नाचणाऱ्यांना वेळेचे भान नव्हते. रात्री आठ वाजता नवरदेव लग्नमंडपात पोहोचला. तेथे व्याही भेटीगाठी व वाघिणशाचा कार्यक्रम सुरू असतानाच उशिर का केला? म्हणून वधूपक्षाने विचारणा केल्यानंतर उभयपक्षात शाब्दिक चकमक होऊन प्रचंड वाद उफाळला.

यावेळी वधूपक्षाने नवरदेवाच्या वऱ्हाडाला बदडून काढले. पुढे काही लोकांनी मध्यस्थी केल्याने वातावरण काहीसे निवळले. याचवेळी वधूपक्षाने या नवरदेवाशी लग्न लावायचे नाही असा ठाम निर्धार केला. वधूपक्षाचा रूद्रावतार पाहून अखेर नवरदेवासह त्याचे वऱ्हाडाला मान खाली घालून परतावे लागले.

वधुपित्याने ऐनवेळी जवळच्याच दुसरबीड गावातील नात्यातील एका तरूणाशी वधूचे लग्न लावून दिले. नाचणारांच्या बेपर्वाईमुळे आपबिती ओढवलेल्या या लग्नाची रंगतदार चर्चा होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT