हिंगोली : कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या | पुढारी

हिंगोली : कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

औंढा नागनाथ : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पांगरा तर्फे लाख येथे कर्जबाजारी झाल्याने एका शेतकऱ्याने शेतातील लिंबाच्या झाडाला कासऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. २६) सकाळी साडे आठच्या दरम्यान उघडकीस आली. अनिल माधवराव देवकर (वय ३५, रा. पांगरा) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अनिल देवकर यांनी बँकेकडून ९३ हजार रुपये कर्ज घेतले होते. तसेच त्याने खासगी कर्जही घेतले होते. त्यामुळे कर्जाला कंटाळून अनिल याने शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात अनिल यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. कळमनुरी पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार पवन चाटसे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button