मुंबई; पुढारी ऑनलाईन : सांताक्रुझमधील पोदार शाळेची बस पहिल्याच दिवशी तब्बल साडे पाच तास गायब झाल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, तब्बल ५ तासांनी बसचा ठावठिकाणा लागल्याची माहिती मिळताच सर्वांचा जीव भांड्यात पडला. सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याने पालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
दरम्यान, विद्यार्थ्यासह बस बेपत्ता असल्याचे समजताच एकच खळबळ उडाली. पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, पोदार शाळेचा आज पहिलाच दिवस होता. त्या बसचा ड्रायव्हर नवीन असल्याने त्याला मार्गांची माहिती नव्हती. बेपत्ता झालेली बस दोन तास उशिरा शाळेत पोहोचली होती, पण आता सर्व विद्यार्थी घरी सुखरुप पोहोचले आहेत.
संबंधित बसच्या कंत्राटदारावर शाळेकडून कारवाई केली जाईल असे ते म्हणाले. अपहरण वगैरे असं काही झालेलं नाही, रस्ता चुकल्याने वेळ झाल्याचे त्यांनी नमूद केले. दुसरीकडे पालकांनी भीतीपोटी आक्रोश सुरु केला. घटनेचं गांभिर्य पाहून पोलीसही शाळेत पोहोचले. त्यांना पालकांच्या संतापाला सामोरे जावं लागले.
हे ही वाचलं का ?