Latest

मिरजेत दारू विक्री जोमात; कारवाई कोमात

Shambhuraj Pachindre

मिरज पुढारी वृत्तसेवा : मिरज शहरासह ग्रामीण भागात असणार्‍या ढाब्यांमध्ये राजरोसपणे दारू विकली जात आहे. मोकळ्या जागेत किरकोळ विक्रेत्यांवर पोलिसांकडून धाडी टाकून कारवाई करण्यात येते. मात्र, ढाब्यांवर सुरू असणार्‍या दारू विक्रीवर मात्र यंत्रणा 'मूग गिळून गप्प' आहे.

मिरज शहरासह ग्रामीण भागात ढाब्यांची संख्या वाढली आहे. यातील काही ढाब्यांवर दारू विक्रीसाठी परवानगी आहे. काही ढाब्यांना दारू विकण्यासाठी परवानगी नाही. तरीदेखील संबंधित ढाब्यांमध्ये दारू विकली जाते किंवा त्या ठिकाणी बसून दारू पिण्यास परवानगी दिली जाते.

एरव्ही मद्यप्राशन करून मोटारसायकल चालविणार्‍यांवर शिकंजा कसला जातो. त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. सार्वजनिक ठिकाणी दारू विक्री केल्याने किंवा दारू प्राशन केल्याने अनेकांवर कारवाई करण्यात येते. मात्र परवानगी नसताना ढाब्यामध्ये दारू पिण्यार्‍यांवर, ढाबा मालकांवर कारवाई केली जात नसल्याचे दिसून येते. मिरज हे कर्नाटकच्या सीमेवर असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विदेशी दारूसह हुबळी मेड दारूची आयात केली जाते. तसेच शहरात हातभट्टी, गावठी दारू इत्यादी राजरोसपणे विकली जात आहे.

दारू विक्रीसाठी शहरातील काही ठिकाणे प्रसिद्ध आहेत. याकडे राज्य उत्पादन शुल्कचे दुर्लक्ष झाले आहे. कोट्यवधी रुपयांचा दारू साठा जप्त करून धडक कारवाया करणार्‍या राज्य उत्पादन शुल्कने ढाब्यांमध्ये अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्याची गरज आहे.

ढाब्यांमध्ये राजरोस विक्री : गुन्हेगारांचे बस्तान, यंत्रणेतील अनेकांची वर्दळ : कारवाई मात्र शून्य 

गुन्हेगारांचे बस्तान कधी मोडीत निघणार?

देशी दारू दुकाने, बार इत्यादी गुन्हेगारांचे अड्डे बनले आहेत. आता ढाब्यांवर देखील निवांत बसून दारू ढोसण्यास मिळत असल्याने अनेक गुन्हेगार जेवणावर ताव मारता मारता दारू ठोसण्यासाठीदेखील आपला मोर्चा ढाब्यांकडे वळविला आहे. यामुळे अनेक गुन्हेगार एकमेकांसमोर उभे ठाकले जात असल्याने त्यांच्यात हाणामारीच्या घटना देखील घडत आहेत. त्यामुळे ढाब्यांवर विनापरवाना दारू विक्रीवर तसेच विनापरवाना ढाब्यात बसून दारू पिण्यास परवानगी असलेल्या ढाब्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी सभ्य ग्राहकांतून होत आहे.

'झिरो'ची ढाबे, बारमध्ये नियमीत उठबस

शहरातील ढाबे आणि बारमध्ये राज्य उत्पादन शुल्कशी संबंंधित असलेल्या एका 'झिरो'ची नियमीत उठबस असते. हा झिरो राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांपासून ते ढाबे, बार चालकांच्या चांगल्या घसटीचा असल्याची चर्चा सध्या जोमात सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्ककडे इतके अधिकारी, कर्मचारी असताना देखील 'झिरो'ची उठबस आणि उसाभर कशासाठी, असा देखील सवाल ढाबे, बार चालकांकडून उपस्थित केला जात आहे.

चोर सोडून संन्याशाला फाशी?

दारू गुत्त्याबाहेर दारू पिण्याच्या उद्देशाने मिळून आला म्हणून सध्या पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. दारू विकणार्‍यांवर कारवाई होत नाही, मग ती ढोसणार्‍यांवर कशासाठी, असा सवाल आहे. केवळ वरिष्ठ अधिकार्‍यांना कारवाया दाखवून खूश करण्यासाठी आणि ढाबा, बार चालकांवरील 'टांगती तलवार म्यान' करण्यासाठी पोलिसांकडून सध्या या जुजबी कारवायांचे 'ढोंग' सुरू असल्याचे दिसून येते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT