नाशिक; पुढारी वृत्तसेवा : तलाठी महिलेकडे अप्रत्यक्षपणे शरीरसुखाची मागणी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पण शरीरसुखासाठी नकार दिल्याने बडतर्फ करेन, अशी धमकी प्रांताधिकाऱ्यांनी दिल्याचा आरोप तलाठी महिलेने केला आहे.
या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार येवला पोलिस ठाण्यात प्रांताधिकारी सोपान कासार यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित कासार यांनी घरी बोलावून जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. प्रांताधिकारी कासार यांच्यावर येवला तालुक्यातील महिला तलाठ्याने गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.
या महिलेने येवला पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर महसूल आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सल्लामसलत करून गुन्हा नोंद करण्यास परवानगी दिली.
पीडितेच्या फिर्यादीनुसार, तलाठी महिलेला प्रांताधिकाऱ्यांनी ३ ऑगस्ट २०२० घरी बोलावले होते. कामानिमित्त घरी गेलेल्या या महिलेला कासार यांनी घर दाखवतो, माझ्या मनाप्रमाणे वागा असे म्हणून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, पीडितेची बदली झाल्यावर तिने मॅट कोर्टात दाद मागितली आहे.