ENGvsIND 4th Test D1 : भारताला तिसरा धक्का पुजारा बाद 
Latest

ENGvsIND 4th Test D1: बुमराहने इंग्लंडला दिले दोन धक्के, बर्न्स-हमीदला केले बाद

backup backup

लंडन; पुढारी ऑनलाईन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना आजपासून केनिंग्टन ओव्हल येथे खेळला जात आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा पहिला डाव १९१ धावांत संपुष्टात आला. त्यानंतर इंग्लंडचे सलामीवीर मैदानात उतरले. चौथ्या षटकातच बुमराहने यजमान दोन धक्के दिले.

रोरी बर्न्सचा दुस-या चेंडूवर त्रिफळा उडवला. आणि हसीब हमीदला विकेटकीपर पंत करवी झेल बाद केले. हमीदला एकही धाव काढता आली नाही. तो शुन्यावर बाद झाला.

शार्दुलचे वेगवान अर्धशतक

१७०.९७ च्या स्ट्राईक रेटने शार्दूलने भारतासाठी दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले. शार्दुलच्या आक्रमक खेळाच्या जोरावर भारताची धावसंख्या २०० च्या जवळ पोहचली आहे.

उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर यांनी आठव्या विकेटसाठी ४८ चेंडूत ६३ धावांची भागीदारी केली. ठाकूर ३६ चेंडूत ५७ धावांवर बाद झाला. ही भारताची आठवी विकेट होती. त्यानंतर आठवा धक्का जसप्रीत बुमराहच्या रुपात बसला. तो शून्यावर धावबाद झाला. यावेळी संघाची धावसंख्या १९० होती. त्यानंतर एक धावेची भर घालून उमेश यादव बाद झाला. मोहम्मद सिराज नाबाद राहिला. याचबरोबर भारताचा पहिला डाव १९१ धावांत संपुष्टात आला.

शार्दुल ठाकूरची फटकेबाजी…

अंतिम सत्राच्या खेळात शार्दुल ठाकूरने आपल्या झंझावाती फलंदाजीने चाहत्यांचे मनोरंजन केले. टीम इंडियाचे सात फलंदाज बाद होऊनही ठाकूरने भारतीय डावाची धावसंख्या दीडशेच्या पुढे नेण्याचे काम केले.

दरम्यान, चहापानानंतर दुसऱ्या षटकात ख्रिस वोक्सने रिषभ पंतला बाद केले. हा टीम इंडियाला सातवा धक्का होता. पंत ३३ चेंडूत ९ धावा करून बाद झाला. यावेळी भारताची धावसंख्या १२७ होती. तत्पूर्वी, याच षटकादरम्यान रोरी बर्न्सने पंतचा सहज झेल सोडला होता.

चहापानापर्यंत भारताची धावसंख्या ६ बाद १२२

चहापानापर्यंत भारतीय संघाने पहिल्या डावात ६ गडी गमावून १२२ धावा केल्या. यष्टीरक्षक रिषभ पंत आणि शार्दुल ठाकूर मैदानात होते. चहापानाची वेळ होण्याआधी उपकर्णधार अजिंक्य रहाणेला क्रेग ओव्हरटनने मोई अली करवी झेलबाद केले. रहाणेकडून मोठ्या खेळीची आशा होती. पण त्याने निराशा केली. रहाणे ४७ चेंडूत फक्त १४ धावा करू शकला. ११७ धावांवर भारताला हा सहावा धक्का होता.

अर्धशतकानंतर विराट कोहली तंबूत परतला…

सलग दुस-या कसोटीत अर्धशतक झळकावणा-या विराट कोहलीला रॉबिन्सनने चकवा देत बाद केले. विकेटच्या मागे त्याचा झेल विकेकीपर बेअरस्टोने पकडला. विराटने ८ चौरांच्या मदतीने ९६ चेंडूत ५० धावा केल्या.

विराट कोहलीचे अर्धशतक…

दुसऱ्या सत्राच्या खेळात भारतीय कर्णधार विराट कोहलीने संयमी खेळीचे प्रदर्शन केले. चार फलंदाज बाद बाद झाल्याने त्याच्यावर दबाव होता. पण अशा आव्हानात्मक परिस्थितीतही त्याने फलंदाजीचे आपले कसब पणाला लावत भारताचा डाव सावरला. त्याने ३९.५ व्या षटकात अंडरसनच्या चेंडूवर एक धाव काढून कसोटी क्रिकेटमधील २७ वे अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे इंग्लंडविरुद्ध ९ वे अर्धशतक आहे. तर या मालिकेतील त्याचे हे दुसरे अर्धशतक आहे.

अजिंक्य रहाणेला जीवदान….

उपकर्णधार अजिंक्य रहाणेला ३२ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जीवदान मिळाले. ख्रिस वोक्सच्या चेंडूवर रहाणेला पंचांनी एलबीडब्ल्यू बाद असल्याचा निर्णय दिला. पण कोहलीच्या सांगण्यावरून रहाणेने डीआरएस घेतला. त्यामध्ये चेंडू तो नाबाद असल्याचे दिसले. त्यामुळे तिस-या पंचांनी मैदानी पंचांचा निर्णय बदलून रहाणे बाद नसल्याचा निर्णय दिला.

भारताला चौथा धक्का

दरम्यान, लंच नंतर सुरू झालेल्या खेळात भारताला चौथा धक्का बसल्या. ३० व्या षटकात ख्रिस वोक्सने रविंद्र जडेजाला बाद केले. जो रुटने त्याचा झेल पकडला. त्यानंतर मैदानात अजिंक्य रहाणे आला.

विराटला जीवदान…

तत्पूर्वी २७.३ व्या षटकात ओक्सच्या गोलंदाजीवर रुटने पहिल्या स्लीपमध्ये झेल सोडून जीवदान दिले. यावेळी विराट २२ धावांवर खेळत होता. इंग्लंडने आतापर्यंत मालिकेत एकूण ११ झेल सोडले आहेत.

दरम्यान, पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या रवींद्र जडेजाने पुन्हा एकदा अपेक्षाभंग केला आहे. संघ संकटात सापडला असताना त्याने संघाला सावरण्या ऐवजी इंग्लंड गोलंदाजांसमोर सपशेल नांगी टाकली. तो १० धावा करून तंबुत परतला. यावेळी टीम इंडियाची धावसंख्या ४ बाद ६९ होती. जडेजा बाद झाल्यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणे मैदानात उतरला आहे.

भारताची खराब सुरुवात

भारताची सुरुवात खराब झाली. ख्रिस वोक्सने रोहित शर्माला २७ चेंडूत ११ धावांवर बाद केले. तर ओली रॉबिन्सनने केएल राहुल १७ धावांवर माघारी धाडत टीम इंडियाला दुसरा धक्का दिला. राहुल पायचित झाला. मैदानी पंचांच्या निर्णयाला त्याने आव्हान देत डीआरएस घेतला. पण तिस-या पंचांनीही राहुल बाद असल्याचा निर्णय दिला.

पुजारा ११ व्यांदा अँडरसनचा बळी…

चेतेश्वर पुजाराही मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. जेम्स अँडरसनने त्याला अवघ्या ४ धावांवर बाद केले. पुजाराच्या रुपात भारताला हा तिसरा धक्का होता. यावेळी भारताची धावसंख्या ३९ होती. टेस्ट क्रिकेटमध्ये अँडरसनने पुजाराला बाद करण्याची ११ वी वेळ होती.

विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २३,००० धावा करणारा खेळाडू

विराटने इतिहास रचला

विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २३,००० धावा करणारा खेळाडू बनला आहे. कोहलीने ४९० डावांमध्ये हा विक्रम केला आहे. त्याने सचिन तेंडुलकरला (५२२) मागे टाकले. विराट भारताचा तिसरा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३,००० धावा करणारा जगातील सातवा खेळाडू ठरला.

दरम्यान, इंग्‍लंडचा कर्णधार जो रुटने टॉस जिंकला. ढगाळ वातावरण आणि खेळपट्‍टीची परिस्‍थिती पाहता त्‍याने प्रथम गोलंदाजी करण्‍याचा निर्णय घेतला आहे. इंग्‍लंडच्‍या संघात दोन बदल करण्‍यात आले आहेत.

जोस बटलर याच्‍या जागी ओली पोप तर सॅम करनऐवजी ख्रिस वोक्‍स याचा संघात समावेश करण्‍यात आला आहे.

उमेश यादव, शार्दुल ठाकूरला संघात स्‍थान

भारताने हेडिंग्ले येथे झालेला तिसरा कसोटी सामना एक डाव आणि ७६ धावांनी गमावला. यामुळे संघात बदल केले जातील, अशी शक्‍यता वर्तविण्‍यात येत होती. मात्र इशांत शर्मा आणि मोहम्‍मद शमी हे जखमी असून त्‍यांच्‍या जागी उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर यांचा संघात समावेश करण्‍यात आला आहे.

टॉसनंतर बोलताना भारताचा कर्णधार विराट कोहली म्‍हणाला, टॉस तुमच्‍या नियंत्रणात असत नाही. तुम्‍ही कोणत्‍याही परिस्‍थितीत खेळ्‍ण्‍यास सज्‍ज असावे लागते. या सामन्‍यात आम्‍हाला एका चागंला पार्टनरशिपची गरज आहे.

भारतीय संघ
रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्‍य रहाणे, ऋषभ पंत(यष्‍टीरक्षक), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोमम्‍मद सिराज.

इंग्‍लंडचा संघ
रोरी बर्न्स, हसीब हमीद, डेव्‍हिड मलान, जो रुट (कर्णधार), ओली पोप, जॉनी बेअरस्‍टो (यष्‍टीरक्षक), मोईन अली, ख्रिस वोक्‍स, क्रेग ओव्‍हर्टन,ओली रॉबिन्‍सन, जेम्‍स अँडरसन

मालिका बरोबरीत

लंडनमधील द ओव्हल मैदानावर रंगणार भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना ( ENGvsIND 4th Test D1 ) सामना भारताच्या दृष्टीने महत्वाचा आहे. भारताने हेडिंग्ले येथे झालेला तिसरा कसोटी सामना एक डाव आणि ७६ धावांनी गमावला. त्यामुळे मालिकेत १ – ० अशी घेतलेली आघाडी १ – १ अशी बरोबरीत रुपांतरीत झाली आहे.

काळी पट्टी बांधून भारतीय संघ मैदानावर उतरला…

चौथ्या कसोटीत टीम इंडिया काळ्या फिती लावून मैदानात उतरली. मुंबई क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक वासुदेव परांजपे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी संघाच्या खेळाडूंनी काळ्या फिती बांधल्या. वासुदेव परांजपे यांचे दीर्घ आजाराने ३० ऑगस्ट रोजी निधन झाले होते.

अँडरसनने सचिनला मागे टाकले..

जेम्स अँडरसन मायदेशात सर्वाधिक कसोटी खेळणारा क्रिकेटपटू ठरला. अँडरसनचा इंग्लंडमधील हा ९५ वा कसोटी सामना आहे. त्याच्या आधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने भारतात ९४ कसोटी सामने खेळले. सचिन नंतर रिकी पाँटिंग (९२ कसोटी सामने) आणि अॅलिस्टर कुक (८९ कसोटी सामने) यांचा क्रमांक लागतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT