नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेतील बंडखोर आमदारांबाबत राज्यभरात शिवसैनिकांकडून संताप व्यक्त करीत, निषेध नोंदविला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातही रविवारी (दि.26) शिवसेनेच्या वतीने बंडखोर आमदारांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढत शिवसेनेच्या निष्ठावंतांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे, सुहास कांदे यांच्यासह इतर बंडखोर आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पंचवटी अमरधाममध्ये प्रतीकात्मक पुतळ्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून निधी वाटपात दुजाभाव होत असल्याचे तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील काही आमदारांनी बंड पुकारले आहे. आधी सूरत व तेथून आसाममधील गुवाहाटीत गेलेल्या बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेच्या नेत्यांसह शिवसैनिकांमध्ये रोष वाढत आहे. शनिवारी (दि. 25) राज्यात अनेक ठिकाणी बंडखोर आमदारांच्या कार्यालये व निवासस्थानांवर शिवसैनिकांकडून आंदोलने, दगडफेक, शाईफेक करण्यात आली. त्यानंतर रविवारीदेखील राज्यभरात आंदोलन करण्यात आले. नाशिक शहरात शालिमार येथील शिवसेनेच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिकांची गर्दी जमली होती. सकाळी साडेअकराच्या सुमारास बंडखोर आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यांच्या प्रतीकात्मक तिरड्या तयार करण्यात आल्या. शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह अजय बोरस्ते, दत्ता गायकवाड, विलास शिंदे, सुनील बागूल आदी पदाधिकार्यांसह शिवसेनेचे नगरसेवक, इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. शालिमारमार्गे पंचवटी अमरधामपर्यंत पायी काढण्यात आलेल्या प्रतीकात्मक अंत्ययात्रेला सुरुवात झाली. यावेळी शेकडो शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांविरोधात घोषणाबाजी केली. त्याचप्रमाणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करीत शिवसेनेच्या पाठीशी असल्याचे सांगितले. यावेळी महिला शिवसैनिकांचाही सहभाग लक्षणीय होता. अमरधामच्या प्रवेशद्वारावर प्रतीकात्मक तिरड्यांना आग लावून अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, बंडखोरांना माफी मिळणार नाही, आपण शिवसेनेच्या पाठीशी राहू, असे सांगितले.
कडक उन्हाने शिवसैनिक घामाघूम
सकाळी 11पासून शिवसैनिकांनी घोषणाबाजी करीत प्रतीकात्मक अंत्ययात्रेस सुरुवात केली. यावेळी अंत्ययात्रेत पदाधिकार्यांसह शिवसैनिक शालिमार येथून पंचवटी अमरधामच्या दिशेने निघाले. दीड किमी पायी चालून अमरधामपर्यंत येईपर्यंत शिवसैनिक घामाघूम झाले होते. मात्र, तरीदेखील त्यांच्यातील संतप्त भावना कमी झालेली नव्हती. अमरधाम परिसरात आल्यानंतरही त्यांनी घोषणाबाजी करीत राग व्यक्त केला.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
आंदोलनासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले होते. त्यात शालिमार येथेही भद्रकाली पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी शिवसैनिकांना एका ठिकाणी गोळा होण्यास सांगितले होते. अंत्ययात्रा मार्गातही ठिकठिकाणी पोलिस तैनात होते. साध्या वेशातील पोलिसही बंदोबस्तात होते.
कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल
आंदोलनात शेकडोच्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. आंदोलनाच्या मार्गावर पोलिसांनी आवश्यकतेनुसार त्या-त्या मार्गांवरील वाहतूक बंद केली होती. मात्र, शिवसैनिकांची गर्दी लांबवर पसरली असल्याने वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे शालिमार बाजारपेठेत वाहतूक कोंडी झालेली पाहावयास मिळाली.