Latest

पवार कुटुंबीयांनी 23 कारखाने घशात घातले – राजू शेट्टी

सोनाली जाधव

जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा
साखर संघाचे अध्यक्ष शरद पवार आणि उसाचे दर हेच ठरवणार. सगळ्यात जास्त कारखाने यांच्या ताब्यात. शेतकरी आळशी आहे, तुम्ही शहाणी माणसे आहात. त्यामुळे तुम्ही आमच्यावर सत्ता गाजवत आहात. तुमचा रोहित लई शहाणा निघाला. तो मताची शेती करतो. कन्‍नड साखर कारखाना घशात घालून तो अती कष्टाळू झाला आहे. शरद पवार कुटुंबीयांनी 23 कारखाने घशात घातले आहेत, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. एफआरपी व दिवसा विजेसाठी सरकारला गुडघे टेकायला लावू, असेही ते म्हणाले. नांदणी (ता. शिरोळ) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हुंकार यात्रा व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जयकुमार कोले होते. शेट्टी म्हणाले, दिवसा शेतीसाठी वीज मिळावी ही आमची रास्त मागणी आहे. यासाठी कोर्टात जाणार आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाईने शेतकरी भरडला जात आहे.तुम्हाला कारखान्याची एवढी चिंता आहे, तर शिल्लक साखरेवर नाबार्ड कडून थेट कर्जपुरवठ्यासाठी प्रयत्न केलात तर शेतकरी सुखी होईल.

जि.प.च्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती सावकार मादनाईक म्हणाले, भाजप, महाविकास आघाडीने आम्हाला फसविले. सरकार सत्तेवर येऊन दोन वर्षे झाली तरी यांना कोळसा संपलेला समजत नाही. झोपा काढता काय? निवडणुकीत पराभूत झालो, याचे दुःख नाही. सत्तेत असताना आम्ही पैसे मिळवले नाहीत. शेतकर्‍यांचे पाठबळ मिळवले. त्यामुळेच आमच्या मागे 'ईडी' लागली नाही.
तानाजी वठारे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक सागर संभुशेटे यांनी केले. त्यांनी नांदणीतून दोन लाखांचा निधी दिला. यावेळी सुवर्णा अपराज, विश्वास बालीघाटे, अजित पोवार, रामचंद्र शिंदे, प्रकाश परीट, युनूस पटेल यांच्यासह पदाधिकार्‍यांनी मनोगत व्यक्‍त केले. यावेळी बसगोंडा बिराजदार, विशाल चौगुले, सतीश मगदूम, नंदकुमार पाटील, पापालाल शेख यांच्यासह शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पदे आणि कारखाने कायम तुमच्याकडेच!

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था उभी केली. त्याचा अध्यक्ष पदसिद्ध मुख्यमंत्री हेच असत; मात्र शरद पवार एकदा अध्यक्ष झाले आणि कायमचेच अध्यक्ष राहिले. वसंतरावांनी डेक्कन साखर संकुल उभारले आणि त्याचेही तहयात अध्यक्ष शरद पवार बनले. अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी 23 साखर कारखाने घशात घातल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT