Latest

तलाठी परीक्षेदरम्यान महिला परिक्षार्थीकडे आढळले इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस

गणेश सोनवणे

पंचवटी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

गेल्या महिन्यातील तलाठी पेपर फुटी प्रकरण ताजे असतानाच मंगळवार (दि. ०५) रोजी म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील एका नामांकित शैक्षणिक संस्थेत एका परीक्षार्थी मुलीला इलेक्ट्रॉनिक डिवाइससह पकडल्याचा प्रकार एका परीक्षार्थी मुलाने उघडकीस आणला आहे. मात्र, पुढे काय झाले ही बाब नेमकी गुलदस्त्यातच असून या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, संबंधित संस्थेतील विभाग प्रमुखांकडून काही ही घडले नसल्याचे सांगण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४३४४ पदांच्या भरतीसाठी जमावबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालय यांच्याकडून राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमधील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्याचे कामकाज सुरू आहे. गेल्या महिन्यात दिंडोरी रोडवरील रिलायंस पेट्रोल पंपाजवळील मधुर स्वीट शेजारील परिक्षा केंद्रात पहिल्या टप्प्यातील तलाठी भरतीची परीक्षा केंद्रा बाहेरून एका संशयितास वॉकी टॉकी, हेडफोन, टॅब मोबाईलसह ताब्यात घेतले होते. हे प्रकरण ताजे असतानाच मंगलवार (दि ०५) रोजी दिंडोरी रोडवरील एका नामांकित शैक्षणिक संस्थेत दुपारी तीन ते पाच वाजेच्या दरम्यान तलाठी पेपर सुरू होता. या संकुलातील ब्लॉक क्रमांक १०१  मध्ये शेवटच्या अर्धा तास बाकी असताना महिला पर्यवेक्षिकेला एका परीक्षार्थी मुलीकडे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आढळून आले. यावेळी संबधित महिला पर्यवेक्षिकेने इतर ब्लॉक मधील सहकारी पर्यवेक्षकांना बोलावून घेत ते जप्त केले. त्यानंतर संबधीत परीक्षार्थी मुलीस बाहेर काढण्यात आले व पोलीस कारवाई होत असल्याची माहिती इतर परीक्षार्थीनी देण्यात आली. मात्र ज्यावेळी परिक्षा संपल्यावर परीक्षार्थी बाहेर आले तर ही मुलगी बाहेर उभी असल्याचे परीक्षार्थी मंगेश साळवे यांने दिली.

परीक्षार्थीच्या तपासणीचा प्रश्न

ज्यावेळी परीक्षा केंद्रावर विद्यार्थी हा पेपर देण्यासाठी जातो. त्यावेळी त्याची तपासणी केली जाते. त्यांच्या हातातील धागे देखील काढून घेतले जातात. मात्र तरी देखील परीक्षार्थी मुलगी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आतमध्ये घेऊन कसे जाते हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. यात नेमकं दोषी कोण ? परीक्षा केंद्र की, परीक्षा केंद्रावरील सुरक्षा व्यवस्था ? यात नेमकं कोण सामील आहे हा प्रश्न इतर अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याना केला आहे.

अफवा असल्याचा दावा..

तलाठी पेपर सुरू असतांना शेवटच्या मिनिटांमध्ये काही परीक्षार्थीकडून गैरप्रकार झाला असून यामुळे सर्वांची तपासणी व्हावी अशी मागणी इतर परीक्षार्थीनी केली. त्यानुसार सर्व परीक्षार्थीची तपासणी केली असता कुठलीही वस्तू सापडली नाही. ज्या मुलीवर संशय व्यक्त करण्यात आला होता, तिच्याकडे देखील काही सापडले नाही. गैरप्रकार झाल्याबाबत अफवा होती, अशी माहिती विभागाचे प्रमुख मनोज भालेराव यांनी दिली.

सीसीटीव्ही फुटेज गुलदस्त्यात ?

परीक्षार्थी साळवे यांनी ब्लॉक क्रमांक १०१ चे सीसीटीव्ही फुटेज चेक करावे. त्यात सर्व प्रकार उघडा होईल असे आव्हान देखील केले आहे. जेणेकरून प्रामाणिक पणे अभ्यास करून परीक्षा देणाऱ्यांना न्याय मिळेल आणि कॉफी बहाद्दर या प्रक्रियेतून बाहेर पडतील, असेही तो म्हणाला.

कॉपीच्या प्रकरणाबद्दल कोणत्याही प्रकारची लेखी किंवा तोंडी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल नाही. त्यामुळे असा काही कॉपीचा प्रकार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे याची माहिती नाही. याबाबत संबधीत संस्थेतील प्रमुखांकडून माहिती घेतली जात आहे.

राजू पाचोरकर
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, म्हसरूळ पोलीस ठाणे

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT