ठाणे ; पुढारी वृत्तसेवा वसई पूर्वेतून जाणाऱ्या महामार्गावरील खराटतारा या वसई-विरार महानगरपालिकेच्या हद्दीतील महामार्गाच्या लगतच्या के सेरा सेरा नावाच्या कंपनीचा छोटू महाराज हा फायबरचे डोम थिएटर तयार करण्याचा कारखाना आहे. या कारखान्याला आज (मंगळवार) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आग लागली. या कारखान्यात डोम तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ज्वालाग्राही रसायनामुळे बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. या भीषण आगीमुळे काळ्याकुट्ट धुराचे लोट महामार्गावर दुरवरून दिसत होते.
आगीची घटना कळताच घटनास्थळी मांडवी पोलिसांनी प्रथम वीज कर्मचाऱ्यांकडून त्या भागात जाणारा वीज पुरवठा खंडित केला. यानंतर वसई विरार महानगरपालिका अग्निशमन दलाच्या एका बंबांसह घटनास्थळी धाव घेतली. आग शमविण्यासाठी सुरवात केली. मात्र जे डोम तयार करण्यात येतात त्यात ज्वालाग्राही रसायन असल्याने आग अधिक भडकू लागली होती. त्यामुळे पोलिसांनी आणि अग्निशमन अधिकाऱ्यांनी तात्काळ वरून पाण्याचा फव्वारा करणारा स्वयंचलित अत्याधुनिक बंब पाचारण केला.
तर पाण्याची व्यवस्था म्हणून पाण्याचे चार टँकर मागविले. त्यानंतर तास दीड तासांत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत कारखान्यातील लाखो रूपयाचे सामान जळून खाक झाले. तरी सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. आग शमविताना घटनास्थळी मांडवी पोलीस, अग्निशमन दल यांनी तातडीने धाव घेतल्याने कारखान्याच्या एका बाजूला आगीला रोखण्यात यश आले. यामुळे पूर्ण कारखान्याला आग लागली नाही. तसेच हा कारखाना महामार्गावरच असल्याने वाहतूक पोलिसांनी सावधानतेने वाहतूक सुरू ठेवली. दरम्यान ही आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट झाले नसून, शॉर्टसर्किटमूळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
छोटे सिनेमा थिएटर तयार करण्याचा हा कारखाना असून, सिने रसिकांना दूर शहरात जाण्याऐवजी आपल्या भागात सिनेमा पाहता यावा या उद्धेशाने हे डोम थिएटर तयार करण्यात येतात. या डोम तयार करण्याच्या कारखान्यालाच ही आग लागली. दरम्यान अग्निशमन दलाने ही आग शमविल्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परिस्थिती पूर्ण नियंत्रणात ठेवण्यात साऱ्या यंत्रणेला यश आले.
प्रफुल वाघ; वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मांडवी पोलीस ठाणे
हेही वाचा :