Latest

कायरन पोलार्ड : ड्रग्ज गांजा गॅंग्जच्या शहरातला टी २० स्टार!

Arun Patil

आयपीएलचा फिव्हर उतरतो न उतरतो तोच टी-20 वर्ल्डकपची नशा क्रिकेटप्रेमींवर चढत आहे. सध्या टी-20 वर्ल्डकपची पात्रता फेरी सुरू असली, तरी चर्चा मात्र 'सुपर 12'ची होत आहे. यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये फेव्हरेट टीम कोणती, यावर जाणकार आपल्या तर्क-वितर्कांचा किस पाडत आहेत.

या सर्व चर्चेत एक नाव कायम येत आहे ते म्हणजे कायरन पोलार्ड नेतृत्व करत असलेल्या वेस्ट इंडिजचे. वेस्ट इंडिज हा संघ आयसीसीच्या टी-20 रँकिंगमध्ये नवव्या स्थानावर आहे. त्याच्या खालचे सर्व संघ सध्या पात्रता फेरी खेळत आहेत. म्हणजे विंडीज हा तसा पाहिला तर रँकिंगमधला तळातला संघ. मग तो वर्ल्डकपचा दावेदार कसा?

कारण एकच, टी-20 वर्ल्डकपच्या दावेदारीसाठी रँकिंग नाही, तर संघाची ताकद महत्त्वाची असते. त्या संघाचे कॅरेक्टर महत्त्वाचे असते. हे सर्व वेस्ट इंडिज संघात आहे. विशेष म्हणजे, ते गतवेळचे विजेते आहेत. त्यांनी 2016 ला भारतात झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडला पराभूत करून ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. विंडीज हा असा एकमेव संघ आहे ज्याने दोनवेळा वर्ल्डकप जिंकला आहे. आता हा संघ कायरन पोलार्ड च्या नेतृत्वात यूएई आणि ओमानमध्ये धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे.

विंडीजच्या संघाला सारखे सारखे कायरन पोलार्डच्या नेतृत्वातील संघ म्हणण्याचे एक कारण आहे. व्यावसायिक टी-20 स्टार ते विंडीजच्या संघाचे नेतृत्व करण्यापर्यंत कायरन पोलार्डने केलेली वाटचाल हे ते कारण. पोलार्ड कधी काळी वेस्ट इंडिजच्या संघाला खिजगणतीतही धरत नव्हता. तो विंडीजच्या संघापेक्षा व्यावसायिक टी-20 स्पर्धांना, त्यातील पैशांना अधिक महत्त्व द्यायचा. आता तो या संघाचा कर्णधार आहे. सहसा क्रिकेटपटू देशाकडून क्रिकेट खेळतात आणि मग व्यावसायिक क्रिकेटकडे वळतात किंवा व्यावसायिक खेळाला प्राधान्य देतात. त्यामुळे कायरन पोलार्ड चा हा उफराटा प्रवास फारच रंजक आहे.

त्याची कथा सुरू होते त्रिनिदादच्या पोर्ट ऑफ स्पेनपासून साधारणपणे 20 किलोमीटरवर असलेल्या टाकारिग्वा या निमशहरी भागातून. कायरन पोलार्ड तरुण होत होता त्या काळात टाकारिग्वा हे शहर ड्रग्ज, गांजा, गँगवॉर आणि खून यासाठी कुप्रसिद्ध होते. तेथे ड्रग्ज, गांजा, खून ही सामान्य गोष्ट होती. त्यातच कायरन पोलार्ड हा सिंगल पेरेंट चाईल्ड. त्याच्या आईने त्याला वाढवले. त्यांची आर्थिक परिस्थिती यथातथाच होती. तो एका मुलाखतीत म्हणाला होता, आई ज्यावेळी तुम्हाला सांगते की, आपल्याकडे इकतेच पैसे आहेत त्यावेळी तुम्हाला अनेक त्याग करावे लागतात.

अशा परिस्थितीत कोणती आई आपल्या मुलाचे क्रिकेट खेळण्याचे चोचले पुरवेल; पण कायरन पोलार्ड ने आपले क्रिकेटचे वेड अशा आव्हानात्मक परिस्थितीतही जोपासले. क्रिकेटच्या मैदानावरही त्याला सुरुवातीला नकार मिळाला. क्लबच्या दारातून फक्‍त सहा महिने वय कमी होते म्हणून तो माघारी परतला होता. मात्र, क्रिकेटबद्दलची पॅशन त्याला सहा महिन्यांनी पुन्हा त्या क्लबच्या मैदानावर घेऊन आली. वयाच्या मानाने धिप्पाड शरीरयष्टी पाहून कोणीही त्याच्यात गोलंदाजीचे भविष्य पाहील. मात्र, क्रिकेटच्या मैदानात पोलार्डने चेंडूऐवजी पहिल्यांदा बॅटलाच पसंती दिली.

पोलार्डमुळे शाळेच्या चेंडूंचे बजेट बिघडायचे

त्याची फलंदाजीची सुरुवात ही 10 व्या क्रमांकावरून सुरू झाली. त्याला त्याचे शाळेतील पार्टटाईम प्रशिक्षक फक्‍त तो चेंडू मैदानाबाहेर घालवतो म्हणून नेटमध्ये फलंदाजीला सगळ्यात शेवटी पाठवायचे. कारण, पोलार्डमुळे त्यांच्या शाळेच्या चेंडूंचे बजेट बिघडायचे; पण सामन्यावेळी त्याला त्याच्या फटकेबाजीमुळे क्रमवारीत बढती मिळायची. शाळेत तो सार्वजनिक किट वापरत होता. त्याच्याकडे स्वतःचे असे किट नव्हते. तरीही पोलार्ड प्रसिद्ध होता.

लहानपणापासूनच पोलार्डच्या बॅटिंगचे लोक चाहते होते. तो मारत असलेल्या लांब लांब षटकारांचे लोक पागल होते. क्लबस्तरावर, वयोगटातील सामने खेळतानाही पोलार्डची बॅटिंग पाहण्यासाठी लोक खास स्टेडियममध्ये गर्दी करायचे. पोलार्ड खेळत असलेल्या काळात विंडीजचा गौरवशाली क्रिकेटिंग इतिहास लयाला गेला होता. मात्र, अस्सल क्रिकेटवेड्या विंडीजमधील लोकांना पोलार्डच्या रूपात एक आशेचा किरण दिसत होता.

पोलार्ड मोठा होत होता, तसतसे टी-20 क्रिकेटही मोठे होत होते. त्यामुळे पोलार्डचा कल टी-20 क्रिकेटकडे अधिक असणे साहजिकच होते. असा हा विंडीजचा प्रेक्षक खेचून आणणार्‍या पोलार्डने मात्र विंडीजकडून खेळण्यात सुरुवातीच्या काळात अनुत्सुकता दाखवली होती.

विंडीज क्रिकेटमध्ये त्यावेळी अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणावर होते. तर दुसर्‍या बाजूला टी-20 व्यावयासिक क्रिकेट जोर धरू लागले होते. पोलार्ड आपल्या पंचविशीत पोहोचला होता. तरी तो फ्रिलान्स क्रिकेटर होता. सहसा वृद्ध क्रिकेटपटू फ्रिलान्स क्रिकेट खेळायचे. त्यातच 2010 मध्ये कायरन पोलार्डने वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचा केंद्रीय करार नाकारून टी-20 लीग क्रिकेटला प्राधान्य दिले.

यावरून त्याच्यावर टीका झाली. मयाकल होल्डिंग तर म्हणाला की, 'पोलार्ड माझ्या मते क्रिकेटपटू नाहीच.' मात्र, पोलार्डवर याचा काही परिणाम झाला नाही. देशापेक्षा पैशाला महत्त्व देण्याबाबत कायरन पोलार्डचे एक वेगळे मत आहे. ज्यावेळी तुम्हाला तुमचे कुटुंब जगवायचे असते. दिवसाच्या शेवटी तुम्ही त्यांच्या टेबलवर दोन घास ठेवता का, हे महत्त्वाचे असते.

पोलार्ड एका मुलाखतीत यासंदर्भात म्हणाला होता की, जोपर्यंत तुम्ही त्या परिस्थितीतून जात नाही तोपर्यंत तुम्हाला ती परिस्थिती लक्षात येत नाही. पोलार्डची आई सामने पाहायला मैदानात नेहमी जायची. मात्र, तिच्या मनात कायम धाकधूक असायची. मुलगा क्रिकेटमध्ये पुढे जाईल की नाही. आधीच घरातील परिस्थिती जेमतेम, त्यामुळे महागड्या क्रिकेटच्या नादात पोरगा कमवणार किती, असे प्रश्‍न तिच्या मनात होते.

व्यावसायिक पोलार्ड राष्ट्रीय संघाचा कर्णधार बनला

त्याच काळात पोलार्डचे लग्‍न झाले होते आणि तो बापही बनला होता. त्याच्यावर जबाबदारींचे ओझे होते. त्याची कमावणारी आई आता वृद्ध होत होती. पोलार्डला तिला आता या धकाधकीच्या जीवनातून निवृत्त करून चांगले आयुष्य द्यायचे होते. त्यामुळे पोलार्ड ज्या परिस्थितीतून गेला त्या परिस्थितीतून त्याच्या कुटुंबाला जाऊ द्यायचे नव्हते.

असा हा व्यावसायिक क्रिकेटनंतर एका देशाचा कर्णधार बनला. क्रिकेटच्या या प्रवासात त्याने एक आक्रमक फलंदाज ते उत्तम कर्णधार म्हणून मजल मारली आहे. त्याने रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्सचे चांगले नेतृत्व केले. त्याला आता मॅन मॅनेजमेंटही चांगले जमते.

त्याने आपल्या संघाबद्दल बोलताना सांगितले की, 'आमच्यासाठी निकोलस पूरन आणि शिमरोन हेटमायर यांच्यासारख्या युवा खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी आहे. त्यांना कवेत घेऊन त्यांना संरक्षण देऊन त्यांच्याकडून कामगिरी करून घ्यायची आहे. आम्ही संघ म्हणून या युवा खेळाडूंबरोबर काम करणार आहोत.' त्याच्या या वक्‍तव्यावरून तो विंडीजची संघ बांधणी करण्याबाबत किती उत्सुक आहे, हे दिसते. कधी काळी विंडीज बोर्डाचा करार नाकारणारा पोलार्ड आता संघ बांधणीच्या गोष्टी करत आहे. पोलार्ड समजण्यासाठी तो सांगतो त्याप्रमाणे पोलार्ड ज्या परिस्थितीतून गेला त्याच परिस्थितीतून गेले पाहिजे.

पोलार्डच्या नेतृत्वाखाली विंडीज संघात टी-20 मधील रथी-महारथी खेळणार आहेत. हे रथी-महाराथी म्हणजे टी-20 मधील स्वतंत्र संस्थानंच आहेत. प्रत्येकाचे वलय वेगळे आणि प्रत्येकाची मिजास वेगळी. याचबरोबर काही युवा खेळाडूंही संघासोबत आहेत. ही युवा मंडळी या टी-20 मधील रथी-महारथींकडून बाळकडू घेऊन त्यांचे आणि पर्यायाने विंडीज क्रिकेटचे भविष्य घडवणार आहेत. आता पोलार्डवर या रथी-महारथींना सांभाळण्याबरोबरच युवा खेळाडूंसमोर वेस्ट इंडिजचा संघ म्हणून एक आदर्शही उभा करायचा आहे.

त्यामुळे मुंबई इंडियन्सचा पार्टटाईम कर्णधार होणं आणि वेस्ट इंडिजच्या हेलकावे खाणार्‍या शिडाच्या जहाजाला किनार्‍यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पेलणं यात जमीन-अस्मानचा फरक आहे. तगडे खांदे लाभलेल्या पोलार्डला हे आव्हान पेलायचं आहे आणि यंदाचा टी-20 वर्ल्डकप हा त्याची सत्त्वपरीक्षा बघेल, यात शंका नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT