Latest

ऋषभ पंत याच्या कारकिर्दीला सेटबॅक

Arun Patil

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : टीम इंडियाचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या गाडीचा दिल्लीहून घरी परतताना अपघात झाला. हम्मादपूर झालजवळ रुरकीच्या नरसन सीमेवर त्याच्या कारला अपघात झाला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंतच्या कपाळाला आणि पायाला दुखापत झाली आहे. किमान सहा महिने तरी ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानावर परतणार नसल्याने त्याच्या कारकिर्दीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. आधीच तळ्यात-मळ्यात असलेल्या त्याच्या कारकिर्दीला मोठा सेटबॅक बसण्याची शक्यता आहे.

ऋषभ पंतच्या दुखापती अजूनही गंभीर दिसत आहेत, रुग्णालयाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, पंतला बरे होण्यासाठी 6 महिने लागू शकतात. पण टीम इंडियाच्या वेळापत्रकावर नजर टाकली तर ऋषभ पंत आगामी काळात खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या मालिकांना मुकणार आहे.

जानेवारीत होणार्‍या श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आणि वन-डे मालिकेत ऋषभ पंतची निवड झाली नव्हती. याशिवाय फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात 4 कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर मालिका होणार आहे, जी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या द़ृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. ऋषभच्या टी-20, वन-डे सामन्यांसाठीच्या निवडीवर शंका आहे, पण तो कसोटीत सर्वोत्तम खेळाडू आहे. अशा परिस्थितीत तो सावरला नाही तर टीम इंडियाचा तणाव वाढू शकतो.

यानंतर, इंडियन प्रीमियर लीग 2023 मार्च आणि एप्रिलमध्ये होणार आहे, ज्यामध्ये ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे. आयपीएलमध्ये खेळणे म्हणजे 2 महिने सतत क्रिकेट खेळणे, ज्यासाठी फिटनेस खूप महत्त्वाचा असतो. ऋषभ पंत या दुखापतीतून सावरला नाही तर आयपीएललाही मुकावे लागू शकते. अशा परिस्थितीत या मोठ्या गोष्टी ऋषभ पंतसाठी टेन्शन वाढवणार्‍या ठरू शकतात, पण सर्वच स्तरावरून त्याच्या तब्येतीत सुधारणा व्हावा यासाठी प्रार्थना केली जाते आहे.

बीसीसीआय खंबीरपणे पाठीशी

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी एक पत्रक जारी केले आहे. पंतची दुखापत गंभीर असली तरी तो आता स्थिर असून त्याला कोणताही धोका नाही. बीसीसीआय पंतच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. त्याचबरोबर जे डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत त्यांच्याशी देखील बोर्डाने संपर्क केला आहे. पंतला सर्वोत्तम उपचार मिळतील आणि यातून बाहेर काढण्यासाठी बोर्डाकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल, असे शहा यांनी म्हटले आहे. पंतचे करिअर खराब होऊ देणार नाही, बीसीसीआय खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे आहे, असे देखील शहा म्हणाले. शहांनी फोनवरून त्याच्या आईशी संवाद करत आश्वासन दिले.

मदतीऐवजी पैसे लुटले

कारमध्ये ऋषभ एकटाच होता, तो स्वतः गाडी चालवत होता. मात्र, अपघातादरम्यान तिथे पोहोचलेल्या काही तरुणांनी ऋषभला मदत केलीच नाही, शिवाय त्याच्या बॅगेतील पैसे घेऊन पळ काढला. ऋषभ पंतने स्वत: कारचा दरवाजा उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र दुखापतीमुळे तो बाहेर पडू शकला नाही. त्याच्याकडे एक बॅगही होती.

हेही वाचा…

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT