सोलापूर : उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले. 
Latest

उजनी धरण १०० टक्के भरले; ११६.८९ टीएमसी पाणीसाठा

Arun Patil

बेंबळे ; पुढारी वृत्तसेवा : सोलापूरसाठी वरदायिनी ठरणारे उजनी धरण मंगळवारी (दि. 5) रोजी 100 टक्के भरले. गेल्या आठवड्याभरात पुणे जिल्ह्यात तसेच धरण क्षेत्रात झालेल्या पावसाने झपाट्याने धरण भरले. त्यानुसार धरणात तब्बल 116.89 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. यामध्ये उपयुक्‍त पाणीसाठा 52.32 टीएमसी आहे. अजूनही धरणात आवक सुरूच आहे. धरणातून विसर्गही सुरू आहे. धरण भरल्यामुळे शेतकरी, उद्योजक, कारखानदारांसह उजनीवर अवलंबून असणार्‍या सोलापूरसह छोट्या मोठ्या गावांचा जीव भांड्यात पडला आहे.

गेल्या सन 2019 मध्ये उजनी 27 ऑगस्टला 100 टक्के भरले होते, तर 2020 वर्षी उजनी 6 ऑगस्ट रोजी 100 टक्के झाले होते. मात्र, यावर्षी गेल्यावर्षी पेक्षा जवळपास दोन महिने उशिरा उजनी धरण 100 टक्के झाले आहे. उजनीची निर्मिती झाल्यापासून म्हणजे गेल्या 41 वर्षांत 32 वेळा 100 टक्के भरले गेले. उजनीचे जलसंपदाशास्त्र उगम क्षेत्रातील पावसावर अवलंबून आहे. म्हणजे उजनीवरील 19 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडणार्‍या पावसावर अवलंबून आहे.

त्या धरणांतून आलेल्या पाण्यामुळे हे धरण भरले जाते. पण 2009 मध्ये केवळ उजनी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसावर उशीरा का होईना 100% झाले होते. त्यावेळी वरील धरणातून उजनी धरणात एक थेंब ही पाणी आले नव्हते.

दरम्यान यावर्षी मात्र पावसाची दमदार हजेरी झाली. मध्ये ओढ दिली तरी पुणे जिल्ह्यातील धरणांंच्या विसर्गातून धरण भरत गेले. सध्याही उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे उजनीत पाणीसाठा वाढला. दरम्यान, उजनी धरणात दौंड येथून विसर्गातही घट झाली होती. त्यात पुन्हा वाढ होऊ लागली आहे.

तो आज सायंकाळी 6034 क्युसेक झाला आहे. उजनी पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाने कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे.त्यामुळे उजनी धरणात मागील वर्षीच्याा तुलनेत उशिरा का होईना पाणीसाठा 100% झाला आहे.

धरणाचे पाणलोट क्षेत्र हे 14856 चौ.कि.मी. असून या धरणाखाली 29000 हेक्टर क्षेत्र ,51 गावे (पुणे-25 ,सोलापूर -23 तर अहमदनगर- 3) बुडाली आहे. उजनी धरणाच्या निर्मितीनंतर त्या पाण्याद्वारे जवळजवळ 3 लाख 97 हजार 800 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आले आहे.

तसेच 29000 हेक्टरवर उभा असलेल्या उजनी धरणातील पाण्यावर उजनी डावा कालवा 96000 हेक्टर, उजनी उजवा कालवा 51800 हेक्टर तसेच भीमा,सीना,नदी,बोगदा यातून 2,50,000 हेक्टर अवलंबून आहे. या धरणापासुन निघालेल्या डावा व उजव्या कालव्याचे अंतर 432 कि.मी.आहे. त्याद्वारे 1 लाख 47 हजार 800 हेक्टर क्षेत्र आठमाही ओलिताखाली आले आहे.

पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील धरणे पूर्ण भरली आहेत. सध्या दौंड येथून 6034 क्युसेक्स पाण्याचा प्रवाह उजनीत येत आहे.धरण शंभर टक्के भरण्याच्या अवस्थेत आल्याने वरून येणारा विसर्गचा विचार करून पाणी सोडण्याचा निर्णय धरण व्यवस्थापन घेणार आहे.                                                                                                                                      – धीरज साळे, अधीक्षक अभियंता, उजनी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT