Latest

आमदारांची ‘फाईव्ह स्टार’ बडदास्त; १३ कोटींची उधळपट्टी

Shambhuraj Pachindre

मुंबई : चंदन शिरवाळे; येत्या 20 जूनला होणार्‍या निवडणुकीत विधान परिषदेमध्ये 11 पैकी 10 उमेदवार इन होणार आणि एक आऊट राहणार असला तरी या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांचे आमदार पंचतारांकित हॉटेलमध्ये चार दिवस मुक्‍कामी राहणार असून, त्यांचे हे फाईव्ह स्टार चेक इन-चेक आऊट तब्बल 13 कोटी रुपयांची उधळपट्टी ठरणार आहे.

10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात उतरविल्याने आमदार फोडाफोडीच्या भीतीने सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या आमदारांची पंचतारांकित बडदास्त ठेवली आहे. शुक्रवारी हे सर्व आमदार वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेलांमध्ये चेक इन झाले. सोमवारी मतदान झाल्यानंतरही त्यांचा तिथेच मुक्‍काम असेल. 285 आमदारांच्या चार दिवसांच्या मुक्कामावर सुमारे 13 कोटी रुपये खर्च होणार आहेत. याशिवाय दोन्ही वेळचे भोजन आणि 'करमणूक' खर्च वेगळा असेल.

शिवसेनेने आपल्या 55 आमदारांना पवईच्या वेस्ट इन पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले आहे. या हॉटेलच्या संकेतस्थळावर सुपिरियर रूमचे एका दिवसाचे भाडे 10 हजार 500, डिलक्स हिल व्ह्यू 12 हजार 500 तर क्लब रूमचे भाडे 13 हजार 500 दर्शविले आहे. शिवसेनेने आमदारांना सुपिरियर रूममध्ये ठेवले तरी एका दिवसाच्या भाड्यापोटी शिवसेनेला 5 लाख 77 हजार रुपये मोजावे लागतील. यावरून 55 आमदारांच्या चार दिवसांच्या मुक्कामासाठी शिवसेनेला 23 लाख रुपये मोजावे लागणार आहेत.

राष्ट्रवादीचे 53 आमदार आहेत. सध्या ईडीच्या कोठडीत असलेले मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाने मतदानाचा अधिकार नाकारला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे 51 आमदार ट्रायडेंट पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत. या हॉटेलमध्ये सुपरियर रूमसाठी एका दिवसाला 18 हजार 500, प्रीमियरसाठी 22 ते 23 हजार तर प्रीमियर ओशियनसाठी 24 ते 25 हजार रुपये भाडे आहे. यानुसार राष्ट्रवादीला 51 आमदारांसाठी एका दिवसाला 10 लाख 20 हजार तर चार दिवसांसाठी 52 लाख 20 हजार मोजावे लागतील.

भाजपने आपल्या आमदारांची ताज हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे. ताजमधील सुपिरियर रूमसाठी दिवसाला 9 हजार तर लक्झरीसाठी 10 हजार 500 रुपये भाडे आहे. भाजपाला 106 आमदारांच्या एका दिवसाच्या निवासाला 9 लाख 45 हजार खर्च येईल. तर चार दिवसांसाठी 9 कोटी 92 लाख खर्च होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसकडे 44 आमदार आहेत. त्यांचीही बडदास्त पंचतारांकितच आहे. फोडाफोडीच्या भीतीपोटी काँग्रेसने हॉटेलचे नाव अद्यापही उघड होऊ दिले नाही. पंचतारांकित सोयीनुसार काँग्रेसला निवासापोटी 2 कोटी खर्च येण्याची शक्यता आहे. याशिवाय विधानसभेत 13 अपक्ष आणि लहान पक्षांचे 16 आमदार आहेत. यामधील काही आमदार महाविकास आघाडीचे तर काही भाजपा समर्थक आहेत. त्यांचा खर्चही आघाडी आणि भाजपाच्या खात्यातून होणार आहे.

या आमदारांचा निवास खर्च 11 लाख रुपयांपर्यंत होण्याची शक्यता आहे. याशिवाय, पंचतारांकित हॉटेलचे शनिवार आणि रविवार तसेच सुट्ट्यांच्या दिवसांचे वेगळे भाडे असते. या चार दिवसांच्या मुक्कामात दोन सुट्ट्यांचे वार आल्यामुळे या दिवसाचे भाडे अधिक असेल. त्यामुळे या राजकीय पक्षांनी अपेक्षित धरलेल्या रकमेपेक्षा थोडा जादा खर्च होणार आहे. हा खर्च पाहता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा या पक्षांचे सुमारे 19 ते 20 कोटी रुपये 'डावावर'लागले आहेत.

वेस्ट इन, ट्रायडेंट, ताज या हॉटेलमध्ये व्यवस्था : भोजन आणि 'करमणूक' खर्च वेगळा

अशी आहे शाही नजरकैद

पक्ष एकूण आमदार खर्च
शिवसेना 55 23 लाख
राष्ट्रवादी 51 52 लाख
भाजप 106 10 कोटी
काँग्रेस 44 2 कोटी
छोटे पक्ष, अपक्ष यांच्यासाठीचा खर्च 11 लाख

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT