ठाणे : दिलीप शिंदे शिवसेना स्थापन झाल्यापासून ठाणे जिल्ह्यातील शिवसैनिक, नेते, मंत्री हे मुंबईतील मातोश्रीवर जाऊन दिवंगत बाळासाहेब ठाकरे, त्यांच्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून गुरुपौर्णिमेनिमित्त आशीर्वाद घेत असत. शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि नवीन इतिहास घडण्यास सुरवात झाली. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदा असे घडणार आहे की, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह 40 आमदार, अनेक प्रमुख नेते हे मातोश्रीवर ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी जाणार नसून त्यांची लगबग ही मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील आनंदाश्रम येथे बुधवारी पाहायला मिळेल, असे सध्याचे चित्र आहे.
धर्मवीर आनंद दिघे यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील शिवसेना नेते, कार्यकर्ते तसेच राज्यातील अनेक प्रमुख नेते हे आपले गुरु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी जात असत. मातोश्रीवर सकाळपासून रात्रीपर्यंत शिवसैनिकांची रेलचेल असे. त्यांच्या पश्चात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी राज्यातून सैनिक, नेते मुंबईत दाखल होतात. त्यात सर्वाधिक भरणाचा हा ठाणे जिल्ह्यातील नेते, शिवसैनिकांचा असतो. यावर्षी हे चित्र बदलणार आहे. आनंद दिघे यांचा वारसा पुढे चालविणार्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली आणि एकनाथ शिंदे यांच्या रूपाने ठाण्याला पहिले मुख्यमंत्रीपद मिळाले. त्यातून ठाकरे विरुद्ध शिंदे गट असे दोन गट शिवसेनेत सक्रिय झाले आणि त्यांच्या अस्तित्वाची लढाई सर्वोच्च न्यायालयात पोहचली आहे.
शिवसेनेतील बंडाळीनंतर 13 जुलैला पहिली गुरुपौर्णिमा आहे. या गुरुपौर्णिमेला मुख्यमंत्री शिंदे हे मातोश्रीवर जातील का? त्यांची शक्यता नाहीच. त्यांच्यासोबत ठाणे जिल्ह्यातील आमदार, प्रमुख नेते, माजी नगरसेवक, पदाधिकारी हे देखील जाणार नाहीत. गटातटामध्ये दुभंगलेल्या शिवसेनेत सध्या शिवसैनिकांचे इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झालेली आहे. काहींनी थेट शिंदे गट स्वीकारले तर काहींनी ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्धार केला आहे.
बहुतेक जण हे योग्य वेळेची प्रतीक्षा करीत आहेत. अशा राजकीय पार्श्वभूमीवर गुरुपौर्णिमेला मुंबईतील मातोश्रीवर बंडातील सामील मंत्री, आमदार, नेते जाण्याची शक्यता नसल्याने ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे यांचे आनंदाश्रम हे दरवर्षीपेक्षा यंदा गुरुपौर्मिणेला विशेष गजबजलेले दिसेल. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आनंदाश्रमात बसणार आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यासह राज्यातील अनेक नेते, आमदार हे ठाण्यात येऊन गुरु पौर्णिमा साजरी करण्यासाठी येण्याची दाट शक्यता असल्याने जय्यत तयारी करण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा