ठाणे : गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देणाऱ्या एचपीव्ही लसीबाबत सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर नागरिकांनी अजिबात विश्वास ठेवू नये, असे आवाहन ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी केले आहे. चुकीची व दिशाभूल करणारी माहिती पसरवून पालकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून त्यामुळे अनेक मुली महत्त्वाच्या संरक्षणापासून वंचित राहण्याचा धोका असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
महिलांमध्ये आढळणाऱ्या गंभीर आजारांपैकी गर्भाशय मुखाचा कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर) हा अत्यंत धोकादायक आजार मानला जातो. या कर्करोगाचे प्रमुख कारण ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा विषाणू आहे. मात्र योग्य वयात प्रतिबंधात्मक लसीकरण केल्यास या आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. “एचपीव्ही लस पूर्णपणे सुरक्षित असून जगातील अनेक देशांमध्ये ती मोठ्या प्रमाणावर दिली जाते.
आतापर्यंत या लसीचे गंभीर दुष्परिणाम आढळलेले नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा किंवा चुकीच्या माहितीकडे नागरिकांनी दुर्लक्ष करावे. कोणतीही शंका असल्यास केवळ अधिकृत आरोग्य केंद्र किंवा तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच योग्य माहिती घ्यावी,” असे डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.
पालकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता आपल्या मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य वेळी लसीकरण करून घ्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली आहे. आता 14 वर्ष पूर्ण (15 वर्षे पूर्ण न झालेले) वयोगटातील मुलींना ही लस सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्यामुळे पालकांनी पुढाकार घेऊन आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे, असेही डॉ. पवार म्हणाले. ही लस सुरक्षित, प्रभावी आणि जगभर मान्यताप्राप्त असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी वैज्ञानिक माहितीवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे.