

Dombivli Jijainagar Electric Shock Case
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडी परिसरातील जिजाईनगर येथे रविवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत विजेचा धक्का लागून सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. रस्त्याच्या कडेला असलेल्या महावितरणच्या फिडर पिलरला स्पर्श होताच तीव्र विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याने हा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. कृष्णा संजय यादव (वय ७ वर्षे ९ महिने) असे मृत मुलाचे नाव आहे.
या प्रकरणी कृष्णाचे वडील संजय मेवालाल यादव यांनी दिलेल्या जबानीवरून टिळकनगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. जिजाईनगरमधील विठ्ठल कृपा इमारतीत यादव कुटुंब गेल्या आठ वर्षांपासून राहत आहे. संजय यादव हे डोंबिवली परिसरात ४०७ टेम्पो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर त्यांचे वडील मेवालाल यादव (७२) भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. घरात ६५ वर्षीय आई राजपती आणि पत्नी निशा राहतात. संजय व निशा यांना अर्जुन आणि कृष्णा अशी दोन मुले आहेत.
रविवारी सकाळी शाळेला सुट्टी असल्याने कृष्णा विठ्ठल कृपा इमारतीच्या मागील मोकळ्या जागेत बॉल खेळत होता. खेळताना त्याचा बॉल यमुना अर्जुन सोसायटीसमोरील लाईटच्या फिडर पिलरजवळ गेला. बॉल उचलण्यासाठी तो पिलरजवळ गेला असता स्पर्श होताच विजेचा तीव्र धक्का बसून तो पिलरला चिकटून बेशुद्ध पडला. ही घटना पाहून स्थानिक नागरिकांनी तातडीने त्याला स्टार कॉलनीतील एसीई हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र तेथील डॉ. मुकेश केणे यांनी तपासून सकाळी ८.४५ वाजता कृष्णाला मृत घोषित केले.
यानंतर केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर कृष्णाचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. मुलाचा मृतदेह पाहताच कुटुंबीयांचा आक्रोश उसळला. पाथर्ली येथील स्मशानभूमीत कृष्णावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कृष्णाच्या मृत्यूस जबाबदार कोण?
मुलाच्या मृत्यूबाबत कुणावर संशय किंवा तक्रार नसल्याचे कृष्णाचे वडील संजय यादव यांनी जबानीत नमूद केले आहे. पोलिस उपनिरीक्षक आर. बी. सदावर्ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, यमुना अर्जुन सोसायटीसमोरील महावितरणच्या फिडर पिलरमधून झालेल्या विद्युत प्रवाहामुळे हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. संबंधित फिडर नादुरुस्त होता का, त्याकडे महावितरणचे दुर्लक्ष झाले का, असा प्रश्न परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.