Latest

अजित पवार विधानसभेत म्हणाले एसटीचे विलिनीकरण अशक्य

अमृता चौगुले

मुंबई; पुढारी ऑनलाईन : एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरुच आहे. काही संघटनांनी या संपातून माघार घेतली आहे, तर काही संघटनांनी अद्याप आपल्या मागण्यांसाठी संप चालू ठेवला आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी अडून आहेत. याच पार्श्वभूमीवर आज विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी याबाबत मोठा खुलासा केला. त्यांनी या संपाबाबत विधानसभेत बोलताना म्हणाले, एसटीचे विलिनीकरण अशक्य आहे, कर्मचाऱ्यांनी हा विषय डोक्यातू काढून टाकावा.

राज्यशासनामध्ये एसटीचे विलिनीकरण होण्याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांप्रमाणे उद्या प्रत्येक जण उठेल आणि विलिनीकरणाची मागणी करु लागतील. प्रत्येकांनी हट्ट धरला तर कसे चालेल. कोणाचे ही सरकार असले तरी ते विलिनीकरण करु शकत नाही.

एसटी कर्मचारी हे आपलेच कर्मचारी आहेत. त्यांचे विलिनीकरण करुन घेणे अशक्य आहे. पण, सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार नाही. सर्वांनाचा भत्ता आणि पगार वाढ वेळेवर मिळलीच पाहिजे. प्रत्येकांचे कुटुंब जगले पाहिजे. कोणीही आत्महत्या करता कामा नये. यासाठीच शासनाने सकारात्मक पाऊल उचलत एसटी कर्मचाऱ्यांची पगारात वाढ केली आहे. शिवाय १० तारखेपर्यंत पगार होईल याची हमी देखिल शासनाने घेतली आहे. जर एसटी महामंडळाकडे पैसे नसतील तर राज्य शासन कर्मचाऱ्यांचा पगार करेल व तशी हमी राज्यसरकारने घेतली असल्याचे अजित पवार म्हणाले.

अजित पवार पुढे म्हणाले, गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे एसटी बसेस बंद होत्या. या काळात सरकारने पैसे देऊन एसटी कर्मचाऱ्यांचे पगार केले आहेत. संप मिटावा यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी अनेकदा संघटनांशी चर्चा केली. आम्ही देखिल अनेक मान्यवरांशी याबाबत चर्चा केली. एसटी कर्मचारी आपलेच कर्मचारी असल्यामुळे सकारात्मक विचार करुन कर्मचाऱ्यांचा अधिक लाभ व्हावा या दृष्टीने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. पण विलिनीकरणा बाबत ते आग्रही आहेत त्यांनी हा हट्ट आता सोडला पाहिजे. विलिनीकरणाबाबत समिती नेमली आहे. समितीने उच्च न्यायालायाला अहवाल दिला आहे पण, समितीला अभ्यासासाठी आणखी काळ हवा आहे. समितीने तसे न्यायालायाला कळवले आहे. अशी माहिती यावेळी अजित पवार यांनी विधान सभेत दिली.

संपातील एसटी कर्मचाऱ्यांनी आत संप थांबवून आपआपल्या कामावर रुजू व्हावे. सर्वत्र शाळा आणि कॉलेजस सुरु झाले आहे. एसटी संपामुळे त्यांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा ठिकाणावर पोहचण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गरीबातल्या गरीब माणसाला एसटी शिवाय पर्याय नसतो. या लोकांनाचे हाल थांबावेत यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप थांबवून कामावर रुजू व्हावे, असे आवाहन देखिल यावेळी अजित पवार यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT