पणजी; पुढारी वृत्तसेवा : दक्षिण गोव्याला जोडणाऱ्या जुवारी पुलाचा कठडा तोडून मोटार नदीत (Zuari River) कोसळल्यामुळे चौघेजण बुडाल्याची धक्काटायक घटना घडली आहे. बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली आहे. मध्यरात्र असल्यामुळे आणि मोटारच नदीत कोसळ्ल्यामुळे मदत कार्यास अडथळे आले. दरम्यान, आज सकाळी मदतकार्यादरम्यान मोटार पुलाखाली सापडली.
मध्यरात्रीनंतर मोटारीचा, बुडालेल्यांचा शोध घेण्यास प्रारंभ झाला होता. पाण्याचा वेगवान प्रवाह, त्यातच सध्या समुद्राला भरती असल्यामुळे शोध घेणे जिकीरीचे झाले आहे. किनारी तट दलाच्या तसेच नौदलाच्या जवानांनी अथकपणे शोध घेतला. अग्निशामक दलाचे जवानही मदत करत आहेत. जुवारी नदीत कोसळलेली डस्टर मोटार (जीए08 के 8334) कुठ्ठाळी येथील प्रिसीला तावारीस क्रुझ यांची असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली. या माहितीवर कोणत्याही यंत्रणेने अधिकृत शिक्कामोर्तब मात्र केलेले नाही. कुठ्ठाळी किंवा ते लोटलीचे असू शकतात, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
प्राथमिक माहितीनुसार एका दांपत्यासह मोटारीत चौघे जण होते, असे समजते. वाढदिवसाच्या मेजवानीनंतर परतत असताना नियंत्रण सुटल्याने वेगवान मोटार कठडा तोडून नदीत कोसळली.
नौदलाच्या प्रयत्नांना यश आले आहे. अपघातातील मोटार पुलाखाली सापडली आहे. तर मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचलंत का?