Yoga Day 2023  
Latest

 Yoga Day 2023 : योग ही जागतिक चळवळ बनली आहे; आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ संदेश

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : "आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून योग ही एक जागतिक चळवळ बनली आहे आणि जगभरातील करोडो लोक योग करत आहेत." असं वक्तव्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त व्हिडिओ संदेश दिला आहे. त्यांनी आज (दि.२१) संयुक्त राष्ट्र मुख्यालयात UN नेतृत्व आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सदस्यांसह आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. आज २१ जून, आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन साजरा होत आहे. जाणून घ्या पीएम मोदींनी आपल्या व्हिडिओ संदेशात काय म्हंटल आहे. (Yoga Day 2023)

१८० हून अधिक देशांचे एकत्र येणे ऐतिहासिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सकाळी ९ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशवासियांना व्हिडिओ संदेश ट्विट करत शुभेच्छा दिल्या.  त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, "भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेपाच वाजता, मी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आयोजित केलेल्या योग कार्यक्रमात सहभागी होणार आहे. भारताच्या आवाहनावर १८० हून अधिक देशांचे एकत्र येणे ऐतिहासिक आहे. जेव्हा योग दिनाचा प्रस्ताव आला तेव्हा २०१४ मध्ये युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीला विक्रमी संख्येने देशांनी पाठिंबा दिला होता,". 'ओशन रिंग ऑफ योग' बद्दल बोलताना पीएम मोदी म्हणाले, "'ओशन रिंग ऑफ योग' ने यावर्षी योग दिनाच्या कार्यक्रमांना अधिक खास बनवले आहे. त्याची कल्पना योगाची कल्पना आणि त्याचा विस्तार यांच्यातील परस्परसंबंधांवर आधारित आहे.

Yoga Day 2023 : 'वसुधैव कुटुंबकमसाठी योग'

यावर्षी योग दिनाची थीम 'वसुधैव कुटुंबकमसाठी योग' अर्थात 'एक विश्व-एक कुटुंब' या स्वरूपात सर्वांच्या कल्याणासाठी योग आहे. तो योगच्या भावनेवर भर देतो, जो सर्वांना एकत्र करतो आणि सोबत घेऊन जातो. दरवर्षीप्रमाणे या वेळीही देशाच्या कानाकोपऱ्यात योगाशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Yoga Day 2023 : 'आंतरराष्ट्रीय योग दिन' बद्दल हे माहित आहे का?

'आंतरराष्ट्रीय योग दिन' हा दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी या दिनाला मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. १९३ देशांपैकी १७५ देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. त्यानुसार दि. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यंदाही योगदिन विविधतेने साजरा होत आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT