Latest

WTC Final 2023 : शास्त्री म्हणतात, ऑस्ट्रेलियापासून प्रेरणा घ्या!

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियासारखे निर्भेळ यश मिळवायचे असेल तर ऑस्ट्रेलियाकडूनच भारताने प्रेरणा घ्यावी, असे जाहीर आवाहन भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले. ऑस्ट्रेलियाने युवा व अनुभवी खेळाडूंची नेहमीच उत्तम मोट बांधली असून त्याचे अनुकरण भारतानेही करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. भारतीय संघ 2023 ते 2025 जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या आपल्या मोहिमेला दि. 12 जुलैपासून कॅरेबियन दौर्‍याच्या माध्यमातून सुरुवात करत आहे. त्या पार्श्वभूमीवर शास्त्री बोलत होते. (WTC Final 2023)

'थिंक टँकला काय वाटते आणि निवडकर्त्यांना काय वाटते, यात कोणताही फरक असू नये. यासाठी योग्य नियोजनाची आवश्यकता आहे. ऑस्ट्रेलियन संघ याबाबतीत अतिशय सरस आहे. ते एकाच वेळी पाच खेळाडू बाहेर जाण्याची वाट पहात बसत नाहीत. तो संघ युवा व अनुभवी खेळाडूत उत्तम समन्वय साधतो. याचमुळे त्यांचे नवे खेळाडू वरिष्ठ खेळाडूंकडून शिकत राहतात आणि त्या संघाला अनुभवाची काहीच कमतरता भासत नाही. माझ्या मते निवड समितीने आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. काही लोकांना हे रुचणार नाही. पण, संघाचे हित सर्वोच्च स्थानी असायला हवे,' याचा शास्त्री यांनी येथे उल्लेख केला. (WTC Final 2023)

ओव्हलवरील पराभवानंतर रोहित शर्माने देखील याच बाबतीत आपली मते जाहीरपणे मांडली होती. 'कोणत्याही स्पर्धेत खेळत असताना वर्चस्व कसे प्रस्थापित करता येईल, यावर प्रत्येक संघाचा भर असतो. आपण मात्र भविष्यात नेमके काय करायचे आहे, याबाबत स्पष्ट नाही, असे जाणवते. पुढील दोन वर्षांत काय रणनीती असावी, हे आताच निश्चित होणे आवश्यक आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये बरेच खेळाडू उत्तम खेळ साकारत आहेत. त्यांच्या कामगिरीत सातत्य आहे,' असे रोहित त्यावेळी म्हणाला होता.

ऑस्ट्रेलियाने अलीकडील काही वर्षांत स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर या स्टार खेळाडूंसह मार्नस लॅबुशेन, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरून ग्रीन यांच्यासारखे अव्वल खेळाडू घडवले असून याचा त्यांच्या युवा खेळाडूंना लाभ होतो आहे. याच रणनीतीचे अनुकरण भारताने करावे, असे रवी शास्त्री यांचे मत आहे.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT