लंडन; वृत्तसंस्था : भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूरने अप्रतिम फलंदाजी करून भारताची शान राखली. रहाणेने 129 चेंडूंत 89 धावा केल्या. तर शार्दूल ठाकूरनेही अर्धशतकी खेळी करत 51 धावांची खेळी केली. रवींद्र जडेजानेही 48 धावांची खेळी करून भारताच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. या धावांच्या जोरावर भारताने 69.4 षटकांत सर्वबाद 296 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 173 धावांची आघाडी घेतली आहे. चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसर्या डावात 1 बाद 23 धावा केल्या होत्या. डेव्हिड वॉर्नरला मोहम्मद सिराजने बाद केले. (WTC Final 2023)
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या होत्या. भारताने तिसर्या दिवशी आपला पहिला डाव 5 बाद 151 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. मात्र, सुरुवातीलाच श्रीकर भरत 5 धावांवर बोलँडची शिकार झाला. यानंतर आलेल्या शार्दूल ठाकूरने अजिंक्य रहाणेला साथ देण्यास सुरुवात केली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी भागीदारी रचत संघाला 200 धावांच्या पार पोहोचवले. दरम्यान, मुंबईकर अजिंक्य रहाणेने आपले अर्धशतक पूर्ण करत तब्बल 18 महिन्यांनी केलेले आपले पुनरागमन यशस्वी करून दाखवले. (WTC Final 2023)
अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूर यांनी सातव्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी रचत भारताला तिसर्या दिवशी उपहारापर्यंत 260 धावांपर्यंत पोहोचवले. खेळ थांबला त्यावेळी अजिंक्य 89 तर शार्दूल ठाकूर 36 धावा करून नाबाद होते.
ऑस्ट्रेलियासाठी डोकेदुखी ठरलेली ही भागीदारी अखेर उपहारानंतर तुटली. पॅट कमिन्सने अजिंक्य रहाणेला 89 धावांवर बाद करत भारताला मोठा धक्का दिला. अजिंक्य आणि शार्दूलने 109 धावांची भागीदारी केली. अजिंक्य बाद झाल्यानंतर शार्दूल ठाकूरने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याला साथ देण्यासाठी आलेला उमेश यादव चौकार मारून भारताची धावसंख्या फॉलोऑनच्या पलीकडे नेली. मात्र, यादव लगेच बाद झाला. मोहम्मद शमीने आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. शार्दूलने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, कॅमेरून ग्रीनने त्याला 51 धावांवर बाद करत भारताला मोठा धक्का दिला.
शार्दूल ठाकूर अर्धशतकानंतर बाद झाल्यानंतर मोहम्मद शमीने 11 चेंडूंत 13 धावा करत भारताला 296 धावांपर्यंत पोहोचवले. अखेर मिचेल स्टार्कने मोहम्मद शमीला बाद करत भारताचा पहिला डाव संपवला.
आतापर्यंत एकाही भारतीय खेळाडूला जी गोष्ट जमली नाही ती अजिंक्य रहाणेने या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत करून दाखवली आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणेने आता एक इतिहास रचला आहे.
तब्बल 512 दिवसांनी पुनरागमन करणार्या अजिंक्यने झुंजार अर्धशतक ठोकले. याचबरोबर त्याने कसोटी क्रिकेटमधील 5,000 धावांचा टप्पादेखील पूर्ण केला.
अजिंक्य हा आता या विश्व अजिंक्य स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत भारताच्या एकाही खेळाडूला यापूर्वी या फायनलमध्ये अर्धशतक झळकावता आले नव्हते; पण अजिंक्यने या पहिल्या डावातच अर्धशतक झळकावले आहे.
गेल्या फायनलमध्ये अजिंक्य भारताकडून खेळला होता खरा; पण त्याला जास्त धावा करता आल्या नव्हत्या. या फायनलमध्ये त्याने संघात स्थान पटकावले आणि इतिहास रचला आहे. त्यामुळे विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा मान आता अजिंक्यने पटकावला आहे.
18 महिने संघाबाहेर राहूनही मैदानावर परतलेल्या रहाणेेने आपण अजूनही अजिंक्य, अतर्क्य असल्याचे दाखवून दिले. संधी मिळताच त्याने पुन्हा एकदा आपली उपयुक्तता सिद्ध केली. भारताचा संघ संकटात असताना रहाणेने दमदार अर्धशतक ठोकत संघाची लाज राखली. भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना, खूप मार खाल्ला. त्यानंतर भारतीय फलंदाजांच्या वरच्या फळीनेही निराशा केली, पण अजिंक्य रहाणेने मात्र संघासाठी शानदार 89 धावांची खेळी केली. आधी रवींद्र जडेजा आणि नंतर शार्दूल ठाकूर या दोघांच्या साथीने त्याने संघाला 250 च्या पार नेले. तिसर्या दिवसाचे पहिले सत्र त्याने उत्तम खेळून काढले. त्यात त्याला 1-2 वेळी जीवनदानही मिळाले, पण लंचटाईमच्या नंतर मात्र रहाणेला नशिबाची साथ लाभली नाही. पॅट कमिन्सच्या चेंडूवर रहाणेच्या बॅटच्या कडेला लागून चेंडू उडला. हवेत वेगाने चेंडू जात असतानाच ग्रीनने चपळाईने हवेत झेप घेतली आणि संघाला एक मोठे यश मिळवून दिले.
हेही वाचा;