पुढारी ऑनलाईन : जगातील सर्वात लांब जलमार्गावरील MV गंगा विलास क्रूझचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (दि.१३) सकाळी लोकार्पण करण्यात आले. याचबरोबर वाराणसीमधील टेंट सिटीचेही व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून उद्धघाटन करण्यात आले. जगातील सर्वात लांब आणि २७ नद्यांची सफर घडवत वेगवेगळ्या पर्यटनस्थळांना भेट देत जाणार्या 'एमव्ही गंगा' या लक्झरी क्रूझची सफर शुक्रवारपासून सुरू होत आहे. वाराणसी ते दिब्रुगड (व्हाया बांगला देश) असा ५१ दिवसांचा हा लक्झरियस प्रवास असणार आहे.
याप्रसंगी केंद्रीय मंत्री एस सोनोवाल, यूपीचे मुख्यमंत्री आदित्यनाथ लॉन्च इव्हेंटमध्ये उपस्थित आहेत. बिहारचे डीसीएम तेजस्वी यादव आणि आसामचे मुख्यमंत्री एचबी सरमा या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सहभागी झाले होते.
भारतातील पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. या नाविण्यपूर्ण क्रूझवर आवश्यक सुविधा, विशेष जेवणाची सोय, सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ही क्रूझ बिहारमधील पाटणा, झारखंडमधील साहिबगंज, पश्चिम बंगालमधील कोलकाता, बांगला देशातील ढाका आणि आसाममधील गुवाहाटी या प्रमुख शहरांमधून जाणार आहे.