Latest

World Family Day : सिंगल मदर पेलताहेत खंबीरपणे कुटुंबाची जबाबदारी

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मी एकटी आत्मविश्वासाने चालत राहिले आणि नोकरी करत आज मुलांची शिक्षणाची आणि कुटुंबाची जबाबदारी पेलत आहे. संघर्ष करावा लागला. पण, हरले नाही. आज मी स्वत:च्या पायावर उभी राहून मी आयुष्य जगत आहे. सिंगल मदर (एकट्याने कुटुंब सांभाळणारी आई) असल्याचा मला अभिमान आहे, अशी भावना अनेक जणींनी व्यक्त केली. (World Family Day)

सध्याच्या घडीला अनेक सिंगल मदर आहेत ज्या आत्मविश्वासाने स्वत:ची आणि मुलांची जबाबदारी पेलत आहेत. आता सिंगल मदर आणि त्यांची मुले… अशी कुटुंबाची नवी संकल्पनाही रुजत आहे. सिंगल मदरचा रस्ता स्विकारणार्‍या 30 ते 50 वयोगटातील महिलांची संख्या वाढली आहे. विज्ञान-तंत्रज्ञान, वैद्यकीय, सरकारी नोकरी, सांस्कृतिक, सामाजिक आदी क्षेत्रांतील महिलांचे प्रमाण सर्वाधिक असून, आपली मुले आणि छोटे कुटुंब असूनही त्या खंबीरपणे आयुष्य जगत आहेत. सोमवारी (दि.15) साजरा होणार्‍या जागतिक कुटुंब दिनानिमित्त सिंगल मदर महिलांविषयी दै. 'पुढारी'ने आढावा घेतला. (World Family Day)

याबाबत फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन पुणेच्या अध्यक्षा अ‍ॅड. वैशाली चांदणे म्हणाल्या, राज्यात अंदाजे सुमारे 45 टक्के संख्या ही सिंगल मदर्सची आहे. शहरी भागासह आता ग्रामीण भागांमध्येही ही संकल्पना रुजत आहे. काहीजण नोकरी आणि व्यवसाय करतात. सिंगल मदर असलेल्या महिला आजच्या घडीला मोठ्या ताकदीने कुटुंबाची, मुलांची जबाबदारी पेलत असून, आर्थिकद़ृष्ट्या सक्षम महिलांची संख्या सिंगल मदर म्हणून अधिक आहे. (World Family Day)

काही वर्षांपूर्वी पतीचे निधन झाले. त्यानंतर कुटुंबाची, दोन मुलांची जबाबदारी माझ्यावर आली. सुरुवातीला नोकरी मिळत नव्हती. संघर्ष केला. आता सगळे मार्गी लागले आहे, असे पुण्यातील शिल्पा देशपांडे यांनी सांगितले.

पतीच्या निधनामुळे, कौटुंबिक कलहामुळे वेगळ्या राहणार्‍या, वडिलांनी मुलांची जबाबदारी न घेणे, घटस्फोट घेतल्यामुळे, मानसिक ताणतणावामुळे कुटुंबापासून दूर राहणे… आदी कारणांमुळे महिला आपल्या मुलांसह आयुष्य जगत आहेत. पुण्यासह मुंबई, नाशिक, नागपूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यांमध्ये सिंगल मदर्सची संख्या सर्वाधिक असून, आता तर ग्रामीण भागांमध्ये सिंगल मदर्सची संख्या वाढत आहे. कोथरूड, वारजे-माळवाडी, औंध, बाणेर, बावधन, विमाननगर, हिंजवडी, डेक्कन, खराडी आदी ठिकाणी सिंगल मदर्स आणि त्यांचे कुटुंब राहत आहेत.

महिलांच्या समस्या

आर्थिक ओढताण, मानसिक ताणतणाव, लोकांचे टोमणे, एकटेपणा, कुटुंबाकडून न मिळणारा पाठिंबा

मला माझ्या आईने आणि कुटुंबीयांनी पूर्ण साथ दिली आणि आज मी सिंगल मदर म्हणून मुलाची जबाबदारी खंबीरपणे सांभाळत आहे, व्यवसाय करत आहे. सिंगल मदर म्हणून कुटुंब सांभाळताना अनेक अडचणी आल्या. पण, लोक काय बोलतात याकडे दुर्लक्ष करून मी आयुष्य जगत राहिले, मुलाचे शिक्षण आणि कुटुंब सांभाळू शकले.
– पल्लवी पायगुडे, व्यावसायिक

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT