पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेट वर्ल्ड कपला आज (दि.०५) गुरूवारी सुरूवात झाली. पण त्यापूर्वी वर्ल्डकप तिकिटांवरून क्रीडाप्रेमींमध्ये मारामारी पाहायला मिळत आहे. अनेक क्रीडाप्रेमी भारतीय संघातील खेळाडूंशी ओळख काढत, तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. तत्पूर्वी वर्ल्डकप तिकिटांची वाढती मागणी पाहता भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने हात वर केले आहेत. या संदर्भात विराटने त्याच्या इन्स्टाग्रामवरून पोस्ट ( Virat Story on Insta) शेअर केली आहे. (World Cup 2023)
वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर विराट कोहलीने बुधवारी त्याच्या इन्स्टावरून एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने त्याच्या मित्र परिवार आणि नातेवाईकांना उद्देशून म्हटले आहे की, कोणी त्याच्याकडे वर्ल्डकपच्या तिकीटाची मागणी करू नये. कारण ते असे करू शकणार नाहीत. विराटसोबतच अनुष्का शर्मानेही तिकिटांसाठी विराटशी बोलण्यासाठी त्यांच्याशी कोणीही संपर्क करू नये, अशी विनंती केली आहे. (World Cup 2023)
विराट कोहलीने त्याच्या इन्स्टावरून दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, आम्ही विश्वचषक खेळण्यासाठी जात आहोत. अशा परिस्थितीत मी माझ्या सर्व परिचित मित्रांना नम्र विनंती करतो की, त्यांनी माझ्याकडे सामन्यांची तिकिटे मागू नयेत. 'तुम्ही घरबसल्या सामन्याचा आनंद लुटा'. विराट कोहलीच्या या आवाहनानंतर अनुष्काने तिच्या ओळखीच्या लोकांनाही विनंती केली आहे. अनुष्काने विराटच्या मेसेजचा स्क्रिनशॉट शेअर करत म्हटलं आहे की, मी यात आणखी एक गोष्ट जोडते ती म्हणजे 'जर एखाद्याच्या मेसेजला रिप्लाय मिळत नसेल, तर कोणीही माझ्याकडे मदतीची विनंती करू नये, असे अनुष्काने देखील म्हटले आहे. (World Cup 2023)
आजपासून (दि.५) विश्वचषकाची सुरूवात होत आहे. विश्वचषक सामन्यांच्या तिकिटांची विक्री सध्या सुरू झाली आहे. तिकीट दरांबाबत पाहिल्यास ४९९ रु ते ४० हजार रुपयांपर्यंत विश्वचषकाची तिकीटे विकली जात आहेत. इतर देशांच्या सामन्यांमध्ये सर्वाधिक तिकिटांची किंमत २९ हजार रुपये आहे. भारत-पाकिस्तान मॅच आणि वर्ल्ड कप फायनलची तिकिटे आधीच विकली गेली असल्याचेही म्हटले गेले आहे.