Latest

सत्तावाटप शिवकुमारांना अमान्य; कर्नाटकात जोरदार रस्सीखेच

मोहन कारंडे

बंगळूर/नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री कोण? सिद्धरामय्या की शिवकुमार? याचा फैसला करण्याची कठीण जबाबदारी पक्षाध्यक्षांवर सोपवण्यात आल्यानंतर सोमवारी राजकीय घडामोडींना वेग आला. या दोन्ही नेत्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आले होते. त्यानुसार सिद्धरामय्या दिल्लीला पोहोचले, मात्र पोटदुखी आणि उच्च रक्तदाबाचे कारण देत शिवकुमार बंगळूरमध्येच थांबले. दरम्यान, पहिली दोन वर्षे सिद्धरामय्या आणि नंतरची तीन वर्षे शिवकुमार मुख्यमंत्रिपदावर राहतील, हा फॉर्म्युला शिवकुमार यांनी फेटाळल्याचे सूत्रांनी सांगितले.

सोमवारी सकाळी सिद्धरामय्या तातडीने दिल्लीला रवाना झाले, तर वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी शिवकुमार कर्नाटकातच थांबून राहिले. त्यांनाही तातडीने दिल्लीला बोलावण्यात आले होते. मात्र, सायंकाळी त्यांना पोटदुखी आणि उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांनी दिल्लीला जाणे सोमवारी तरी टाळले.

राज्यात दोन दिग्गज नेते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याने नाराजीचा धोका स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे वेगवेगळे फॉर्म्युले समोर येत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रारंभीची दोन वर्षे सिद्धरामय्या आणि नंतरची तीन वर्षे शिवकुमार, असा फॉर्म्युला सुचवण्यात आला होता. विधानसभा निवडणुकीची यंत्रणा हाताळण्याची शिवकुमार यांनी केलेली कामगिरी लोकसभेलाही उपयुक्त पडेल, असे सांगण्यात आले होते. मात्र, तो फॉर्म्युला शिवकुमार यांनी फेटाळल्याचे वृत्त आहे. राजस्थानात अशाच फॉर्म्युल्यामुळे तिढा निर्माण झाल्याने असे कालावधी वाटप नको, अशी भूमिका शिवकुमार यांनी घेतली.

कर्नाटकात दणदणीत विजय मिळवल्याचा आनंद साजरा करत असतानाच काँग्रेस श्रेष्ठींना मुख्यमंत्री निवडीची पहिली परीक्षा द्यावी लागत आहे. रविवारी नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाल्यानंतर त्यात नेतानिवडीचे सर्वाधिकार पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना देण्याचा एकमुखाने निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे आता सगळी सूत्रे दिल्लीतून हलणार आहेत.

सिद्धरामय्या दिल्लीत दिल्लीकडून आलेल्या बोलावण्यानुसार सिद्धरामय्या सोमवारी सकाळीच दिल्लीला रवाना झाले. तेथे ते काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांच्या भेटी घेणार आहेत. मात्र डी. के. शिवकुमार यांचा सोमवारी वाढदिवस असल्याने ते दिवसभर आपल्या मतदारसंघात आणि नंतर बंगळुरातत होते. पत्रकारांनी शिवकुमारांना दिल्लीला जाण्याबाबत विचारले असता, 'मला थेट बोलावणे आलेले नाही. आज माझा वाढदिवस असल्याने मी येथेच कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी थांबलो आहे' असे त्यांनी सांगितले.

निरीक्षकांचा अहवाल सादर

रविवारच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला आलेल्या केंद्रीय पक्ष निरीक्षकांनी आपला अहवाल पक्षश्रेष्ठींना सादर केला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, जितेंद्र सिंग व दिनेश बबारिया या निरीक्षकांनी नवीन आमदारांचे म्हणणे ऐकून घेतले होते.

भाजपची टीका

कर्नाटकात मुख्यमंत्री निवडीला विलंब होत असल्याने भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण? यापेक्षा कर्नाटकात सचिन पायलट कोण ठरणार, याची सर्वांना उत्सुकता असल्याचे सांगत काँग्रेसमध्ये सारे आलबेल नसल्याचे भाजपने म्हटले आहे.

बोम्मई संघाच्या पदाधिकार्‍यांना भेटले

माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ पदाधिकार्‍यांची भेट घेतली व राज्यातील निकालांच्या पार्श्वभूमीवर चर्चा केल्याचे 'पीटीआय'च्या वृत्तात म्हटले आहे. राज्यात मोठा पराभव पत्करल्यानंतर बोम्मई यांनी प्रथमच बंगळुरातील संघाच्या 'केशव कृपा' या मुख्यालयात पदाधिकार्‍यांसमोर आपली बाजू मांडली.
निवडणुकीच्या निकालाचा अर्थ, पक्ष संघटनेतील त्रुटी यावर या बैठकीत चर्चा झाली. पत्रकारांशी बोलताना बोम्मई म्हणाले की, संघ ही पालक संघटना असल्याने त्यांचे मार्गदर्शन नेहमी घेत असतो. आज मी चर्चा केली, लवकरच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील आणि इतर पदाधिकारी संघासोबत चर्चा करून पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत मार्गदर्शन घेतील.

सिद्धरामय्या

बलस्थाने
1. सामूहिक नेतृत्व.
2. सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा.
3. पाच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा अनुभव
4. राहुल गांधींची पसंती.
5. स्थिर सरकार देण्यात सक्षम.

कच्चे दुवे
1. पक्ष संघटनेपासून अलिप्त
2. 2018 मध्ये सत्ता आणण्यात अपयश
3. 'बाहेरचा नेता' (निजद) हा अजूनही शिक्का
4. पक्षाध्यक्ष खर्गेंसह कर्नाटकातील ज्येष्ठांचा विरोध
5. दलिताला मुख्यमंत्री करण्याची वाढती मागणी
(सिद्धरामय्या धनगर समाजाचे आहेत.)

शिवकुमार

बलस्थाने
1. पक्ष संघटना मजबूत करण्यात योगदान.
2. पक्षाला पुन्हा सत्तेवर आणण्याचे श्रेय.
3. मूळ काँग्रेसीच, काँग्रेससी कायम एकनिष्ठ.
4. प्रबळ समुदाय वोक्कलिगांचा पाठिंबा.
5. राहुल वगळता उर्वरित गांधी घराण्याचा पाठिंबा.
6. प्रदेशाध्यक्षालाच मुख्यमंत्री बनवण्याची परंपरा.

कच्चे दुवे
1. ईडी, आयटी, सीबीआय तक्रारींतून कारावास.
2. सिद्धरामय्यांच्या तुलनेत कमी अनुभव.
3. फक्त जुन्या म्हैसूर भागापुरताच प्रभाव.
4. वोक्कलिग वगळता इतर समुदायांचा अल्प पाठिंबा.
5. कडक स्वभावामुळे आमदारांमध्ये अत्यल्प लोकप्रिय.

मी एकटाच, माझ्याकडे संख्याबळ नाही : शिवकुमार

दिल्लीचा दौरा रद्द केल्यानंतर सायंकाळी पत्रकारांशी बोलताना शिवकुमार म्हणाले, कुणीही कुणालाही त्यांच्या बाजूला ओढून घेऊ देत, मला फरक पडत नाही. कारण मी एकटाच आहे, संख्याबळ माझ्या बाजूने नाही. मला कुणाचा पाठिंबाही नको आहे. तुम्ही (पत्रकारांनी) मला प्रचारादरम्यान 'खडक' असे संबोधले होते. आता खडकाची चप्पल बनवायची की आधारस्तंभ हे आता लोकांनी ठरवावे. ते मी लोकांवर सोडतो.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT