Latest

Wheat prices | गव्हाच्या किमती १० टक्क्यांनी घसरल्या, केंद्राच्या ‘या’ निर्णयाचा परिणाम

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : अन्नधान्यांच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. खुल्या बाजारात धान्य विकण्याचा निर्णय घेतल्यानंतर गेल्या एका आठवड्यात गव्हाच्या किमती (Wheat prices) १० टक्क्यांहून अधिक घसरल्या असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. या आठवड्यात केलेल्या ई-लिलावाच्या पहिल्या दोन दिवसांत भारतीय खाद्य महामंडळाने (Food Corporation of India) आतापर्यंत ९.२ लाख टन गहू प्रति क्विंटल सरासरी २,४७४ रुपये दराने विकला आहे. खुल्या बाजारातील विक्री योजनेअंतर्गत (OMSS) ३० लाख टन गहू विकण्याचा निर्णय नुकताच केंद्र सरकारने घेतला होता. यापैकी २५ लाख टन गहू मोठा प्रमाणात साठा खरेदी करणाऱ्यांना, पीठ गिरणीधारकांना, ३ लाख टन नाफेडसारख्या संस्थांना आणि उर्वरित २ लाख टन राज्य सरकारांना विकला जाणार आहे.

"गव्ह्याच्या खुल्या बाजारातील विक्रीमुळे गेल्या एका आठवड्याभरात गव्हाच्या किमतीत १० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे," असे अन्न मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. ई-लिलावात विकला जाणाऱ्या गव्ह्याची उचल झाल्यानंतर आणि गव्हाचे पीठ (आटा) बाजारात उपलब्ध झाल्यानंतर किंमती आणखी घसरतील असेही त्यात म्हटले आहे.

ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २ फेब्रुवारी रोजी गव्हाचा दर सरासरी प्रति किलो ३३.४७ रुपये आणि गव्हाच्या पिठाचा दर प्रति किलो ३८.१ रुपये होता. २०२२ मध्ये याच तारखेला गहू आणि गव्हाच्या पिठाचा सरासरी किरकोळ दर अनुक्रमे प्रति किलो २८.११ रुपये आणि ३१.१४ रुपये होता. गेल्या काही महिन्यांत गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किमतीत ४० टक्क्यांनी वाढ झाली होती.

FCI ने आधीच देशभरात २५ लाख टन गव्हाची विक्री सुरू केली आहे. १-२ फेब्रुवारी रोजी ई-लिलावाद्वारे ९.२ लाख टन गव्हाची सरासरी २,४७४ रुपये प्रति क्विंटल दराने विक्री केली आहे. या विक्रीतून २,२९० कोटी रुपये मिळाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

गहू उत्पादनाला उष्णतेच्या लाटेचा फटका

यापूर्वीच केंद्रीय भांडारने कमी दराने गव्हाच्या पिठाची विक्री सुरुवात केली आहे. तसेच नाफेड लवकरच आठ राज्यांमध्ये याच दराने विक्री सुरू करणार आहे. देशांतर्गत उत्पादनात घट झाल्यामुळे देशांतर्गत पुरवठा कमी झाला होता. यामुळे देशातील गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किमती (Wheat prices) वाढल्या आहेत. भारताचे गव्हाचे उत्पादन २०२१-२२ वर्षात (जुलै-जून) १०६.८४ दशलक्ष टनांवर आले. गहू उत्पादनाला उष्णतेच्या लाटेचा फटका बसला होता. याआधीच्या वर्षी हे उत्पादन १०९.५९ दशलक्ष टन होते.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT